क्रिकेट खेळताना अचानक अतुल कोसळले ; घडलेल्या घटनेने जमलेले सारेच हादरले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, मात्र हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले

तासगाव (सांगली) : आटपाडी येथे केमिस्ट असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना मैदानातच ढवळी (ता. तासगाव) येथील अतुल विष्णू पाटील (वय ३२) या औषध विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ढवळीचे ते उपसरपंच होते. रात्री उशिरा ढवळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्यावतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव तालुका संघातून विकेट किपर म्हणून अतुल पाटील खेळत होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सामना सुरू असताना अचानक ते मैदानातच कोसळले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, मात्र हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अचानक घडलेल्या याप्रकाराने सारे अक्षरशः हादरले होते. अतुल पाटील यांची तासगाव, ढवळी येथे दोन औषध दुकाने आहेत. त्यांच्या मागे पत्नी दोन मुलगे, आई, भाऊ असा परिवार आहे. 

हेही वाचा - जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रे, अद्यावत करण्याचे काम हाती घेतले जाईल

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: playing cricket but cause of heart attack one person dead in sangli atpadi