
स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेंमीनी मैदानावर गर्दी केली हाेती. उत्तंग षटकार आणि चाैकारांच्या मेजवानीसह खेळाडूंचे गाेलंदाजीतील काैशल्याचा आनंद प्रेक्षकांना लुटता आला. पाेदार इंटरनॅशल स्कूलने विजय मिळविताच त्यांच्या सर्मथकांनी मैदानात एकच जल्लाेष केला.
सातारा ः क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि गुरुकुल स्कूल यांच्यातील सामन्यात 19 व्या षटकांत पोदारने गुरुकुल संघाचा पाच गडी राखूव पराभव करीत सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेच्या करंडकावर मोहर उमटवली. या स्पर्धेत एकही सामना न गमविणाऱ्या गतविजेत्या गुरुकुल स्कूलचा अंतिम सामन्यात मात्र धक्कादायक पराभव झाला.
छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. अंतिम सामन्याची नाणेफेक प्राथमिक शिक्षक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार शेटे यांच्या हस्ते झाली. गुरुकुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात गुरुकुल स्कूलचा सिद्धार्थ शिताळे पोदारच्या कौशल भडगावेच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकांत गुरुकुलचा भरवशाचा फलंदाज शार्दुल फरांदेचा साहिल औताडेने अथर्व भोसलेच्या गोलंदाजीवर झेल टिपला. गुरुकुल संघ या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच अथर्व भोसले आणि कौशल भडगावेने अद्वैत प्रभावळकर, हर्ष जाधव, आर्य जोशी यांना 21 धावांतच पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला; पण त्यानंतर प्रथमेश वेळेकर, पार्थ सावंत यांनी संघाचा डाव सावरला. गुरुकुल संघाच्या 11 षटकांत 53 धावा झाल्या. याच षटकात प्रथमेशचा कौशलने अथर्व डोईफोडेच्या गोलंदाजीवर झेल घेतला. त्यानंतर पार्थने अरमान मुल्लाच्या साथीने संघाची धावसंख्या वाढवली. गुरुकुलचा डाव 20 षटकांत 119 धावांवर संपला.
विजयासाठीचे 120 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेले पोदारचे स्वयंभू स्वामी आणि हर्षवर्धन देसाई या सलामीच्या जोडीने उत्तम खेळ केला. चौथ्या षटकांत संघाची धावसंख्या 21 असताना स्वयंभूचा प्रथमेश वेळेकरने शार्दुलच्या गोलंदाजीवर झेल घेतला. त्यानंतर हर्षवर्धनच्या साथीस कौशल मैदानात आला. दोघांनी एकेरी दुहेरी धावा काढत संघाची धावसंख्या आठव्या षटकात 50 पर्यंत नेऊन ठेवली. याच षटकात हर्षवर्धनला सिद्धेश गोरेने अरमान मुल्लाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले. त्यापाठोपाठ अद्वैतने साहील औताडेस पायचीत केले. कौशलच्या साथीस आलेल्या कपिल जांगीडने संघाचा धावफलक हलता ठेवण्यासाठी एकेरी- दुहेरी धावांचा सपाटा लावला. पोदारच्या 16.4 षटकांत 102 धावा झाल्या. त्यानंतर गुरुकुलने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून सामना नियंत्रणात ठेवला; परंतु पोदारच्या कपिल, अथर्व भोसले, अथर्व डोईफोडने संयमाने खेळी करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. किरण जावळे, अभिजित देशमुख, नितीन बनसोडे तसेच चंद्रमणी बनसोडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. कौशल भडगावे या सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक ः गुरुकुल स्कूल 20 - सर्वबाद 119 (अवांतर 19). सिद्धार्थ शितोळे 0, शार्दुल फरांदे 7, आर्य जोशी 8, अद्वैत प्रभावळकर 0, हर्ष जाधव 0, प्रथमेश वेळेकर 16 (23 चेंडूंत 2 चौकार), पार्थ सावंत 46 (38 चेंडूंत सात चौकार), आदित्य कणसे 0, सिद्धेश गोरे 6, अरमान मुल्ला नाबाद 16 (19 चेंडूंत 1 चौकार), राहुल वाघमळे 1. कौशल भगडगावे 4-12-2, अथर्व भोसले 4-16-2, कपिल जांगीड 2-15-0, अलोक गायकवाड 4-28-0, अथर्व डोईफोडे 4-25-3, साहिल औताडे 1-4-0, आदित्य जाधव 1-9-2. पराभूत विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल 18.4 षटकांत 5 बाद 120 (अवांतर 16) स्वयंभू स्वामी 17 (17 चेंडूंत 2 चौकार), हर्षवर्धन देसाई 16 (23 चेंडूंत 1 चौकार), कौशल भडगावे 24 (28 चेंडूंत 1 चौकार), साहिल औताडे 2, कपिल जांगीड नाबाद 27 (32 चेंडूंत), अथर्व भोसले 13, अथर्व डोईफोडे नाबाद 5. राहुल वाघमळे 4-19-1, शार्दुल फरांदे 4-25-2, पार्थ सावंत 3-18-0, अरमान मुल्ला 2-11-1, अद्वैत प्रभावळकर 4-29-1, हर्ष जाधव 1-8-0, प्रथमेश वेळेकर 0.4-6-0.
मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेतील यशस्वितांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करंडक, तसेच खेळाडूंना पदक देण्यात आले. या कार्यक्रमास स्पर्धेचे मुख्य प्रायोजक वाईतील दिशा स्पोर्टस अकादमीचे ताजुद्दीन सय्यद हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुरेश साधले, क्रीडा संघटक ऍड. कमलेश पिसाळ, सुधाकर शानभाग, गुरुकुल स्कूलचे प्रेरक आनंद गुरव, निर्मला कॉन्व्हेंट स्कूलचे प्रेरक डॉ. संजय कोरडे, सुरेंद्र शिंदे, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रेरक विजय औताडे, प्राचार्य ए. के. सिंग, अनंत इंग्लिश स्कूलचे अजिज शेख, न्यू इंग्लिश स्कूलचे चंद्रशेखर पानस्कर, महाराजा सयाजीराव विद्यालयाचे संजय अहिरेकर, इर्शाद बागवान, दुर्वास कांबळे, किरण राजेभोसले, विनोद वांद्रे, मयूर कांबळे, उमेश वेलणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी आभार मानले.
जरुर वाचा - सकाळ स्कूल क्रिकेट लीगच्या सर्व सामन्यांच्या बातम्या
हेही वाचा - गुरुकुल स्कूलने 'पोदार' ला गटात हरविले हाेते
लक्षवेधक खेळाडू
सर्वोत्कृष्ट खेळाडू ः शार्दुल फरांदे
सर्वोत्कृष्ट फलंदाज ः आर्य जोशी
सर्वोत्कृष्ट गोलंदाज ः अलोक गायकवाड
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ः प्रथमेश वेळेकर
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक ः साहिल औताडे
अंतिम सामनावीर : कौशल भडगावे