
"विचार पेरले तर कृती उगवते, कृती पेरली तर सवय उगवते, सवय पेरली तर चरित्र्य उगवते आणि चारित्र्य पेरले तर नियती उगवते... म्हणून नियतीने आज चैतन्य, आनंद आणि सहाही सुखे त्यांच्या पदरात राखली आहेत....
विटा : "विचार पेरले तर कृती उगवते, कृती पेरली तर सवय उगवते, सवय पेरली तर चरित्र्य उगवते आणि चारित्र्य पेरले तर नियती उगवते... म्हणून नियतीने आज चैतन्य, आनंद आणि सहाही सुखे त्यांच्या पदरात राखली आहेत.... खरे म्हणजे आपल्या समस्या बाजूला ठेवून येणाऱ्या रसिकांचे अभिनंदन आहे. कारण रघुराज मेटकरी सरांच्या विचारांची पेरणी, साहित्यिकांनी पेरलेल्या विचारांची अंतःकरणात साठवून ठेवण्यासाठी येतात. कवितेमुळेच जीवन सुंदर होते. कवितांमुळे जीवनाचे अंतरंग कळते, असे विचार सुप्रसिद्ध कवी गोविंद काळे यांनी मांडले.
विटा येथे भरलेल्या 39 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी संमेलन अध्यक्ष कवी इंद्रजित देशमुख यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आठवणी सांगून आपली एक बहारदार कविता सादर केली. डॉ. चंदना लोखंडे यांनी स्वागत केले. कवी किरण शिंदे, कवी सिराज शिकलगार, संतोष जगताप, श्रेया शहा, मारुतराव वाघमोडे, मुकुंदराव वलेकर, डॉ. किसन माने यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काव्यसंमेलनात हृदय स्पर्शी व रंजक पद्धतीने शब्द, खंत, भ्रष्टाचार, शेतकरी कायदा, आरोग्य व्यवस्था, कोरोना, आई, बाप, मृत्यू, देशप्रेम, जय महाराष्ट्र अशा विषयावर शंभरावर कविता सादर करण्यात आल्या. प्रास्ताविक रघुराज मेटकरी यांनी; तर सूत्रसंचालन चंदन तामखडे, रुपाली कुमठेकर, सुधीर इनामदार यांनी केले. आभार तात्यासो शेंडगे यांनी मानले.
संपादन ः प्रफुल्ल सुतार