पोलिस निरीक्षक अडकले चौकशीच्या जाळ्यात

तात्या लांडगे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

विजापूर नाका हद्दीत एका तरुणाने लहान मुलाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात 307 कलम दाखल होणे अपेक्षित असतानाही साधा गुन्हा (एनसी) दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. अन्य पोलिस ठाण्यांमध्येही घडलेल्या अशा गंभीर प्रकरणांची दखल घेत पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोलापूर : विजापूर नाका हद्दीत एका तरुणाने लहान मुलाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात 307 कलम दाखल होणे अपेक्षित असतानाही साधा गुन्हा (एनसी) दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. अन्य पोलिस ठाण्यांमध्येही घडलेल्या अशा गंभीर प्रकरणांची दखल घेत पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. विजापूर नाका पोलिस ठाण्यासह अन्य पोलिस ठाण्यातील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या अशा कारनाम्यामुळे पोलिस आयुक्‍तालयात चर्चेला उत आला आहे.

पहा व्हिडीओ ः रेप इंडिया राजकारण तापले लोकसभेत गदारोळ

गुन्ह्यात जप्त केलेली रोकड कमी दाखवणे, गुन्ह्यातून काही आरोपींचे नाव परस्पर कमी करणे, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असतानाही कलमात बदल करणे अशा प्रकरणांची ओरड सातत्याने आयुक्‍तांकडे येत होती. तत्पूर्वी, अशा प्रकरणातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीही सुरु होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍त श्री. शिंदे यांनी एकाचवेळी सर्वच पोलिस ठाण्याचे अधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला. त्यातील बहूतांश अधिकाऱ्यांना बदली झाल्याचे माहितीदेखील नव्हते. त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक झाले मात्र, त्यामागे काही वेगळी कारणे दडल्याचे आता समोर आले आहे. शहरातील नऊपैकी काही पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करताना केलेल्या चुका जाणिवपूर्वक झाल्या आहेत की नजरचुकीने, हे विभागीय चौकशीतून समोर येणार असल्याचे पोलिस आयुक्‍तालयातील सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा ः या शहरात होतेय कोट्यावधींची पाणीचोरी

पोलिस अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळेच बदल्या ! 
भांडण असो की अन्य कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा करणाऱ्या आरोपींना शासन व्हावे या हेतूने फिर्यादी पोलिस ठाण्यात येतो. संबंधित पोलिस ठाण्याच्या परिसरात अवैध धंदे असू नयेत, नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये अशीही अपेक्षा असते. मात्र, काही पोलिस अधिकाऱ्यांनी या सूत्राकडे दुर्लक्ष करीत स्वत:चा मनमानी कारभार सुरु केल्याची माहिती पोलिस आयुक्‍तांना मिळाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांनी नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्‍ती देण्याचे कारण पुढे करीत त्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणल्याचीही चर्चा सुरु आहे. परंतु, या बदल्या करण्याच्या निर्णयाचे सोलापुकरांनी स्वागत केल्याचेही पहायला मिळाले.

विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताना चूक झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार विभागीय चौकशीचे आदेश दिले असून चौकशी समितीच्या अहवालानुसार या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. 
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police inspectors in inquiries trap