पोलिसाला सापडला पडलेला मोबाईल अन्‌

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

17 हजार रुपये किमतीचा सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करुन येथील पोलिस हवलदार मनीष कुमरे यांनी आपल्या कामात असणारी तत्परता दाखवून दिली. 

कुरळप (सांगली) ः 17 हजार रुपये किमतीचा सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करुन येथील पोलिस हवलदार मनीष कुमरे यांनी आपल्या कामात असणारी तत्परता दाखवून दिली. 

जमीर हारुण पटेल हे आपला ट्रक घेवून कोल्हापूर हून कराडच्या दिशेला चालले होते. कणेगाव (ता.वाळवा) येथील चेक पोस्टवरती तपासणी करण्यासाठी ते उतरले. पोस्टवरती असलेले शिक्षक धनंजय पाटोळे यांनी त्यांची सर्व माहिती घेतली. यानंतर पटेल कराडच्या दिशेने मार्गस्थ झाले. त्या दरम्यान बाजूला असलेले पोलिस मनीष कुमरे यांना रस्त्यावर मोबाईल पडलेला दिसला. त्यावेळी तो बंद पडलेला होता. कुमरे यांनी वेळ न दवडता त्या बंद पडलेल्या मोबाइल मधील सिम आपल्या मोबाइल मध्ये घातले. यानंतर मोबाइलमध्ये असलेल्या पूर्वी डायल केलेल्या संबंधित नातेवाईकांना फोन करून संबंधीत मोबाईल सापडला असल्याचे सांगितले. यानंतर पटेल यांच्या नातेवाईकांनी कणेगाव फाटा येथे येवून मोबाइल ताब्यात घेतला.

एरवी हरवलेला मोबाईल सापडणे हे आता खूपच कठीण झाले आहे. मोबाईल पडला की तो परत मिळणार नाही अशीच मानसिकता होते. बहुतांशी लोक मोबाईल हरवला की पोलिस ठाण्याची पायरी चढतात; पण चोरट्यांच्या वेगवेगळ्या चोरी करण्याच्या पद्धतीने मोबाईल चोर सहजासहजी सापडत नाही. मात्र कुमरे यांच्या सारखा प्रामाणिकपणा दाखविला तर हरविलेले अनेक मोबाईल सहजपणे सापडतील. पंधरा दिवसांपूर्वी कुरळप पोलिस ठाण्याचे सचिन मोरे यांनीही मांगले या ठिकाणच्या असणाऱ्या व्यक्तीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने परत केले होते. कोरोना संकटकाळात सतर्क असलेल्या कुरळप पोलिसांची ही कामगिरी कौतुकास पात्र आहे. गृहरक्षक दलाचे सागर पाटील व निरंजन धनवडे हेही उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police man return mobile handset at check post

टॉपिकस
Topic Tags: