पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना विशेष सेवा पदक

अभय जोशी
शनिवार, 23 मार्च 2019

गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद समूळ नष्ट व्हावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. नक्षलवाद्यांची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात यावी म्हणून त्यांनी प्रोजेक्ट अग्निपंख तसेच दुर्गम भागात वाचनसंस्कृती वाढावी यासाठी प्रोजेक्ट ज्ञानगंगा असे उपक्रम यशस्वीरीत्या राबवले.

पंढरपूर : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात खडतर परिस्थितीमधे उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पंढरपूर येथे सध्या कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर रतनकुमार कवडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

डॉ. सागर रतनकुमार कवडे यांनी 2015 ते ऑगस्ट 2018 या काळात गडचिरोली येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून अतिशय उत्तम काम केले. त्यांनी तिथे निर्भीडपणे अनेक नक्षलवादी विरोधी अभियानाचे नेतृत्व केले. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ते आघाडीवर होते. त्यांनी नक्षलवाद्यांनी पेरलेले पाच भूसुरुंग शोधून निकामी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. तीन नक्षलवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांचे आत्मसमर्पण  घडवून आणले. यामध्ये डिव्हिजनल कमांडर या पदाच्या वरिष्ठ पदाच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता.

गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद समूळ नष्ट व्हावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. नक्षलवाद्यांची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात यावी म्हणून त्यांनी प्रोजेक्ट अग्निपंख तसेच दुर्गम भागात वाचनसंस्कृती वाढावी यासाठी प्रोजेक्ट ज्ञानगंगा असे उपक्रम यशस्वीरीत्या राबवले.

नक्षलवाद्यांच्या मनावरील कट्टर संस्कार पुसून त्यांच्यावर लोकशाहीचे संस्कार व्हावेत यासाठी महात्मा गांधी विचारधन अभियान देखील त्यांनी राबवले. त्यांच्या या गौरवास्पदकामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून त्यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer sagar kawade gets medal for work in naxal affected areas