राज्यात पोलिसांची 12 हजार पदे रिक्‍त 

तात्या लांडगे
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

भरतीवरील बंदी उठविण्यात आली असून रिक्‍त पदांनुसार ज्या-त्या जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. दुसरीकडे पोलिस अधिकाऱ्यांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. रिक्‍तपदांचा आढावा लवकरच घेऊन निर्णय घेतला जाईल. 
- दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री 

सोलापूर : वाढती गुन्हेगारी कमी करणे, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाया तसेच राज्यात दिवसेंदिवस निघत असलेले विविध समाजाचे मोर्चे यासह अन्य कारणांसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा द्यावा लागतोय. मात्र, राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची तब्बल 12 हजार 17 पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत असून अनेकांना सुट्या मिळणे कठीण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

कारकुनी काम कमी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त जबाबदारी सोपविता येईल का, याचेही नियोजन शासन स्तरावरून सुरू आहे. वर्ग-चारच्या कर्मचाऱ्यांचा वापर अन्य कामांसाठी करता येतो का, याची चाचपणी केली जात आहे. जेणेकरून अपुऱ्या मनुष्यबळावर ठोस तोडगा निघेल. खबरी पद्धत मागील आठ-दहा वर्षांपासून नाहीशी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांचे काम वाढले असूनही अनेक पोलिस ठाण्यांचा कारभार सहायक पोलिस निरीक्षकांवर चालतोय. मागील एक-दीड वर्षांपासून पदोन्नती झालेल्या पदांवर नव्याने भरतीच करण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम शांतता व सुरक्षितता राखण्यावर होत असल्याचे दिसून येते. 

भरतीवरील बंदी उठविण्यात आली असून रिक्‍त पदांनुसार ज्या-त्या जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. दुसरीकडे पोलिस अधिकाऱ्यांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. रिक्‍तपदांचा आढावा लवकरच घेऊन निर्णय घेतला जाईल. 
- दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री 

रिक्‍त पदांची सद्यस्थिती 
पोलिस उपअधीक्षक 
157 
पोलिस निरीक्षक 
380 
सहायक पोलिस निरीक्षक 
590 
पोलिस शिपाई व हवालदार 
सुमारे 10,890


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police recruitment in Maharashtra