परिस्थितीमुळे जे वडिलांना जमू शकले नाही ते मुलीने करुन दाखवलं

परिस्थितीमुळे जे वडिलांना जमू शकले नाही ते मुलीने करुन दाखवलं

पाटण (जि. सातारा) ः परिस्थितीमुळे वडिलांना स्पर्धा परीक्षा देता आल्या नाहीत. मात्र, मुलींनी प्रशासनात अधिकारी व्हावे, हे स्वप्न मनाशी ठेऊन आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन लावून अभ्यास केला आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आले, याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया दीपाली कोळेकर या पाटण तालुक्‍याच्या लेकीने "सकाळ'शी बोलताना दिली. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू असून, वर्ग एकचे अधिकारी होण्याचा इरादाही दीपालीने व्यक्त केला. 

पाटण तालुक्‍यातील मोरणा विभागातील कुसरुंड गावच्या अंतर्गत 25 ते 30 घरांची संख्या असलेली कोळेकरवाडी माझं गाव. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेले व सध्या येरफळे येथील जिल्हा परिषद पात्र पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत कोळेकर वडील, आई गृहिणी असून थोरली बहीण शीतल हिचा विवाह झाला आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण कोळेकरवाडी गावातच झाले. पाचवी ते दहावीपर्यंत बाळासाहेब देसाई हायस्कूल कुसरुंड, आठवी ते दहावीपर्यंत (कै.) ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल पाटण व अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेज कऱ्हाडला झाले. वडिलांनी आम्हा मुलींना मुलगा समजूनच शिक्षणाचा हट्ट पुरविला. स्पर्धा परीक्षेचा फाउंडेशन कोर्स विद्यानिकेतन ऍकॅडमी सातारा येथे पूर्ण केला व पुणे या शिक्षण नगरीत ग्रंथालयातील पुस्तकांचा नियोजनबध्द पद्धतीने अभ्यास केला. याच दरम्यान सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक किशोर लवटे यांच्याकडे पोलिस उपनिरीक्षकपदासाठीच्या कायद्याचा अभ्यास केला.

चिकाटी, अभ्यासात सातत्य आणि आपण कुटुंबाचे काहीतरी देणे लागतो, ही जाणीव ठेवल्याने मला हे यश मिळाले. या सर्व वाटचालीतून केलेल्या अभ्यासामुळे मला राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळाला. प्राथमिक शाळेत असताना तानाजी पवार, सूर्यकांत दडस आणि प्रमिला राजे यांनी माझ्या शिक्षणाचा पाया भक्कम केल्याने आणि पुढील शिक्षणात शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन माझे मनोधैर्य वाढवणारे ठरले. राज्य लोकसेवा आयोगाच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळाले असून, राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन वर्ग एकचे अधिकारीपद मिळविण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचे दीपालीने सांगितले. 


थोडा उशीर लागतो; पण आनंदही तेवढा सुखद! 

कोळेकरवाडीसारख्या खेडेगावातील मी स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकते, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अधिकारी होऊन प्रशासन सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि कठोर मेहनत व ध्येयाप्रती निष्ठा असेल तर यश शक्‍य होते, हा माझा अनुभव आहे. थोडा उशीर लागतो; पण स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंदही तेवढा सुखद असतो, अशा शब्दात दीपालीने तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

पीएसआय परीक्षेत साताऱ्यातील दीपाली कोळेकर मुलींमध्ये पहिली

मला तुमच्या मदतीची गरज आहे; तुम्ही लवकर टीम घेऊन या

सातारा : खासदार उदयनराजेंनी केला मानाचा मुजरा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com