पोलिसांनी उठवला मूर्खांचा बाजार, कसं तेही बघा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून भाजीविक्रीस परवानगी दिली आहे. मात्र, तेथेही मोठ्या प्रमाणात जमून लोक आदेशाचं उल्लंघन करीत असतील तर कारवाई करावी लागेल. लोकांनी थोडा संयम दाखवण्याची व परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे.

नगर ः व्हायरस अगेन्स्ट वॉर सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले आहे. नगरमध्येही त्याची अंमलबजावणी केली जात आहे. लोकांची जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना ओढाताण होऊ म्हणून प्रशासनाने काही ठिकाणी सवलत दिली आहे. सर्वच ठिकाणी बंद केला तर काहीजण त्याचा काळाबाजार करतात. लोकांना चढ्याभावाने वस्तूंची विक्री करतात. म्हणून जिल्हा प्रशासन जीवनावश्यक वस्तू विकण्यास मुभा देत आहे

काही दीडशहाणे मार्केट यार्डमध्य स्वस्तात भाजी मिळते म्हणून तिकडे गेले. तब्बल दोन ते तीन हजार लोक या बाजारात आले होते. लोकं एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून संचारबंदीचा आदेश काढला आहे. तरीही लोक या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजी घेण्यासाठी आले होते. त्याची माहिती सचित्र व्हिडिओच्या माध्यमातून ई सकाळने प्रशासनापर्यंत पोहोचवली.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी लगेच पोलीस प्रशासनाला सांगितलं आणि पोलिसांनी मार्केट यार्डमध्ये भरलेला तो मूर्खांचा बाजार आपल्या स्टाईलने उठवला.

पोलीस आल्याचे पाहून मग मात्र व्यापाऱ्यांसह ग्राहकांची चांगलीच धावपळ झाली. त्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी त्यांना ताणून फटके दिले. काही वेळातच हा बाजार उठला.

लोकांना काय म्हणावं

लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून भाजीविक्रीस परवानगी दिली आहे. मात्र, तेथेही मोठ्या प्रमाणात जमून लोक आदेशाचं उल्लंघन करीत असतील तर कारवाई करावी लागेल. लोकांनी थोडा संयम दाखवण्याची व परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे.

-राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, नगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police take action against vegetable dealers