पोलिसाला सापडलं लाखाचं मंगळसूत्र, मग काय झालं? 

शिवाजीराव चौगुले 
शुक्रवार, 29 मे 2020

सुहास रामचंद्र रोकडे यांच्या पत्नीचे अडीच तोळ्यांचे सापडलेले मंगळसूत्र पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

शिराळा : मांगले (ता. शिराळा) येथील सुहास रामचंद्र रोकडे यांच्या पत्नीचे अडीच तोळ्यांचे सापडलेले मंगळसूत्र पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

समाज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पोलीस यंत्रणेतील प्रामाणिकपणाची ओळख करून देणारा हा प्रसंग आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लोकांना अन्न, जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप अशी केलेली मदत आपण पाहिली आहे. त्यात रस्त्यावर सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र परत करून सचिन मोरे या पोलिसांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे. 

सांगली व कोल्हापूर जिल्हा हद्दीवर चिकुर्डे (ता. वाळवा) पुलावर कुरळप पोलीस ठाण्याचे चेकपोस्ट आहे. 28 मे रोजी या चेक पोस्टवर कुरळप पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन मोरे ड्युटी बजावत होते. यावेळी अनेक प्रवाशी ये-जा करत होते. या वेळी चिकुर्डे चेक पोस्टवर मांगले येथील सुहास रामचंद्र रोकडे व त्यांच्या पत्नी सुजाता रोकडे या दवाखान्यासाठी कोल्हापूरला गेले होते. सायंकाळी पुन्हा मांगले येथे येत असताना सुहास रोकडे चेक पोस्टवर त्यांच्या खिशातून आधारकार्ड काढत असताना अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र पडल्याचे त्यांना कळले नाही. आधारकार्ड दाखवून ते घरी आले. घरी आल्यानंतर खिशात मंगळसूत्र नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी चेक पोस्टवर आलेल्या शिक्षक मित्र वैभव तोडकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी त्यांचा सखाराम पाटील या शिक्षक सहकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी हवालदार सचिन मोरे यांना ते सापडले असल्याचे सांगितले. त्यानंतर रोकडे दाम्पत्यांच्या ताब्यात ते मंगळसूत्र देण्यात आले. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे रोकडे कुटुंब गहिवरले. मोरे यांच्या प्रमिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
---------- 
 

मी चेक पोस्टवर असताना मला एक महिलेने मंगळसूत्र उचलले. मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मंगळसूत्र माझ्याकडे दिले. आम्ही तेथे चौकशी केली. कुणाला काही माहिती नव्हते. पोलीस ग्रुपवर माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद काटे साहेबांना कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी रोकडे यांचे मंगळसूत्र हरवल्याचे समजले. खातरजमा करून त्यांना ते परत केले. 

- सचिन मोरे, 
पोलीस हावलदार, कुरळप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: policeman give one lack rs gold chain