'बापूं'च्या खांद्यावरून 'दादां'चा निशाणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, या उक्तीप्रमाणे सहकारमंत्री सुभाष देशमुख (बापू) यांच्या खांद्यावरून शहर उत्तरमध्ये भाजपचा पर्यायाने पालकमंत्री विजय देशमुख यांचा निशाणा साधण्याचा प्रयत्न बहुजन समाज पक्षाचे महापालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे (दादा) यांनी चालवला आहे. 

सोलापूर- शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, या उक्तीप्रमाणे सहकारमंत्री सुभाष देशमुख (बापू) यांच्या खांद्यावरून शहर उत्तरमध्ये भाजपचा पर्यायाने पालकमंत्री विजय देशमुख यांचा निशाणा साधण्याचा प्रयत्न बहुजन समाज पक्षाचे महापालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे (दादा) यांनी चालवला आहे. 

आम्ही एकच आहोतचा नारा हे दोन्ही देशमुख देत असले तरी त्यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध लपून राहिले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये "बापू' आणि "दादां'च्या भेटींचे प्रमाण पाहिले तर त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळून येते. 

पतंजली योग समितीच्या प्रांतिक अध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे यांनी दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सहकारमंत्री देशमुख यांनी हजेरी लावली, त्याचवेळी चंदनशिवेही हजर झाले. अळ्ळीमोरेंचे निवासस्थान असलेले वसंत विहार परिसर हा श्री. चंदनशिवे यांच्या प्रभागात आहे, तसेच हा संपूर्ण परिसर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात येतो. दिवाळीचा फराळ घेता-घेता शहर उत्तरमधील विकासकामे आणि रखडलेली कामे यावरही या ठिकाणी गप्पा रंगल्या. देशमुख आणि चंदनशिवे यांच्यात आठ दिवसांत झालेली ही तिसरी भेट. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पालकमंत्री विजय देशमुख आणि चंदनशिवे यांच्यात निर्माण झालेले विळ्या भोपळ्याचे "सख्य' सर्वश्रुत आहे. हद्दवाढ विभागासाठी शासनाने मंजूर केलेला 17 कोटींचा निधी सहकारमंत्र्यांनी आपल्या अधिकारामार्फत दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी वळविला. त्यासंदर्भात चंदनशिवे यांनी त्यांची भेट घेतली असता, शहर उत्तरसाठीही विशेष निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. देशमुख यांनी गेल्या शुक्रवारी व शनिवारी त्यांच्या निवासस्थानी फराळाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणीही या दोघांची भेट झाली, तर रविवारी झालेली भेट आणि त्या ठिकाणी झालेली चर्चा, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भविष्यात होणाऱ्या राजकीय भूकंपाचे संकेत देऊन गेली आहे. प्रत्यक्षात काय होते ते निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावरच दिसून येणार आहे.

'हत्ती'ला मिळतंय 'हाता'चे बळ
महापालिकेच्या कारभारात "हाता'कडून "हत्ती'ला बळ देण्याचे प्रमाण वाढले आहे. विकासकामासंदर्भात कोणतेही आंदोलन असले की, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या हेतूने "हात व हत्ती' एकत्रित येत आहोत, असे स्पष्टीकरण दिले जात आहे. महापालिकेचा कारभार चालविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपला हे निश्‍चितच धोकादायक आहे. भाजपच्या अंतर्गत गटबाजीतून सहकारमंत्री गटाने पालकमंत्र्यांसाठी "रणनीती' आखली तर"हत्ती'चे बळ आणखीन वाढण्याची शक्‍यता असून, "कमळ' अडचणीत येऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political controversy In Solapur