माढा मतदारसंघात समीकरणे बदलली 

माढा मतदारसंघात समीकरणे बदलली 

माढा ः राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्‍यता आहे. माढा मतदारसंघातील आमदार बबनराव शिंदे व प्रा. शिवाजीराव सावंत एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दुसरीकडे मतदारसंघात राजकीय विरोधक म्हणून भाजप एकाकी पडताना दिसत आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह उद्योगांना चालना 
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना असाच राजकीय सामना आतापर्यंत रंगलेला आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेकडून जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यातच विधानसभा निवडणुका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रमुख राजकीय सामना झाला आहे. माढा विधानसभा ही भाजप- शिवसेना युती शिवसेनेच्या वाट्याला सुटल्यामुळे 2014 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात ताकद दाखवण्याची फारशी संधीच मिळाली नाही. 2019 लाही माढा विधानसभा मतदारसंघातील लढत ही राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहिली आहे. सलग सहा वेळा निवडून आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेचे प्रा. शिवाजीराव सावंत एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून पाहिले जातात. मात्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या महाविकास आघाडीमुळे माढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्‍यता आहे. या महाविकास आघाडीच्यामुळे आमदार बबनराव शिंदे व प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यातील राजकीय कटुता संपून त्यांच्यामध्ये राजकीय स्नेह वाढणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हा केवळ विधानसभेसाठी राहणार की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तो राबवला जाणार यावरही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. अर्थात हा राजकीय फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राबवला गेल्यास माढा विधानसभा व माढा तालुक्‍यातील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा फॉर्म्युला भावणार का आणि हा फॉर्म्युला कार्यकर्त्यांमध्ये उतरवण्यात आमदार शिंदे प्रा. सावंत व यशस्वी होणार का असे बरेच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. अर्थात एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या या दोघांचे राजकीय मनोमिलन माढा तालुक्‍यातल्या राजकीय समीकरणात कळीचा मुद्दा ठरणार आहे.
राज्यात आजपासून उद्धव सरकार 
या दोघांचं राजकीय मनोमिलन झाल्यास प्रा. सावंत यांच्यासोबत 2019 च्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार संजय कोकाटे, माजी सभापती शिवाजी कांबळे, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र चवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांच्यासह इतर विरोधकही मनोमिलनात सामील होणारा की तटस्थ राहणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या फॉर्मुल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघातील व माढा तालुक्‍यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनतील किंवा राजकीय गुंता सुटून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असं राजकीय स्वरूप आपणाला पहावयास मिळेल. 
एकंदरीतच माढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय पार्श्वभूमीचा विचार केल्यास ही महाविकास आघाडी भाजपवर भारी ठरण्याची शक्‍यता आहे. कारण आतापर्यंत विधानसभा निवडणुका ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना अशा झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपला आपली फारशी ताकद या मतदारसंघात दाखवण्याची संधी मिळाली नाही. किंवा भाजपची या मतदारसंघातील ताकद युतीमुळे मर्यादित राहिलेले आहे. अर्थात सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दादासाहेब साठे आणि माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माळशिरस तालुक्‍यातील 14 गावांमधून मोहिते - पाटलांची ताकद भारतीय जनता पक्षाकडे आहे. माढा लोकसभा निवडणुकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची ताकद काही अंशी बरी दिसली. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्‍यातील गावांमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनाच मताधिक्‍य मिळाले आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद नेमकी किती हाही प्रश्न आहे. 
भाजपला ताकद वाढवावी लागणार 
महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीतील ही एकजूट अशीच कायम राहिल्यास व हा फॉर्मुला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागू झाल्यास भारतीय जनता पक्ष एकाकी पडण्याची शक्‍यता असून ताकदवान विरोधक म्हणून या मतदारसंघातील पोकळी भरण्यासाठी भाजपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष यासह इतर सहकारी पक्षांना बरोबर घेत ताकद वाढवावी लागणार आहे. विरोधकाची भूमिका बजावणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही महाविकास आघाडीबरोबर आहे. त्यामुळे तालुक्‍यात विरोधक म्हणून भक्कम भूमिका बजावण्याचे भाजपसमोर आव्हानच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com