esakal | कोल्हापुरात राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसलाही मोठा झटका; 'या' नेत्याने सोडला हात
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

या कार्यक्रमातही आवाडे यांनी अतिशय पोटतिडकिने पक्षांतर्गत गटबाजीवर भाष्य केले. त्यामुळे ते कधीच काँग्रेस सोडतील असे वाटत नसतानाच आज त्यांच्याकडून पक्षाला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापुरात राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसलाही मोठा झटका; 'या' नेत्याने सोडला हात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अलिकडेच काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आज (बुधवार) काँग्रेसला रामराम करणार आहेत. काँग्रेसकडून लढू नका, असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले. 

आज सकाळी आकराच्या सुमारास आवाडे यांच्या यंत्रणेकडून माध्यम प्रतिनिधींना फोन आले. त्यानंतरच त्यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. सहा महिन्यापुर्वीच आवाडे यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या आठवड्यात पक्षाच्या नव्या कार्यालयाचा उद्‌घाटन समारंभ अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमातही आवाडे यांनी अतिशय पोटतिडकिने पक्षांतर्गत गटबाजीवर भाष्य केले. त्यामुळे ते कधीच काँग्रेस सोडतील असे वाटत नसतानाच आज त्यांच्याकडून पक्षाला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे. 

आज आवाडे फक्‍त घोषणा करणार असले तरी गेल्यावर्षी 22 ऑगस्टलाच त्यांनी मी काँग्रेसचे काम कधीच थांबवल्याचे सूतोवाच केले होते. यामागे जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी त्यांचा सुरू असलेला वाद हे कारण होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यानंतर त्यांच्यासह माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांनी पक्षाच्या कार्याला वाहून घेतले. कल्लाप्पा आवाडे यांच्या पुढाकारामुळेच पक्षाचे भव्य असे सभागृह तयार झाले. पण तेही कॉंग्रेस सोडण्याची घोषणा सायंकाळी करणार आहेत. राज्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्‍यता असतानाच अचानक काँग्रेसमध्येच आवाडे यांच्या निर्णयाने भूकंप झाला. 

loading image
go to top