जयंतरावांना अनुकंपा तत्त्वामुळे राजकीय संधी : पडळकर

विष्णू मोहिते
Sunday, 24 January 2021

राजाराम बापूंच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना राजकारणात संधी मिळालीय, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज केली.

सांगली ः जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे अनावधानानं राजकारणात आलेले आहेत. राजाराम बापूंच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना राजकारणात संधी मिळालीय, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज केली.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबायचे नावच घेत नाही. या मुद्द्यावर विचारले असता आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही तोफ डागली.

आमदार पडळकर म्हणाले,""राजकारणातील अनुकंपा तत्त्वावर त्यांना राजकीय संधी मिळाली. अनुकंपा तत्त्वावर भरती करताना गुणवत्ता तपासली जात नाही. मंत्री पाटील यांना त्यांच्या गुणवत्तेपेक्षा जास्त मिळालेय. राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. मुळात हा पक्षच भविष्यात राहील की नाही याची मला शंका आहे,'' 

ते म्हणाले,""मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न बघायला हरकत नाही. मात्र 1990 पासून ते राजकारणात करताहेत. एवढ्या वर्षातलं एक मोठे काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत. जिल्ह्यासाठी येईल ते सगळे मतदारसंघात घेऊन जाणे. एवढंच ते काम करतात.'' 

दुपारी बारापर्यंत तरी ते बरे होते : जयंतराव 
आमदार पडळकर यांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता स्मित करीत मंत्री जयंत पाटील म्हणाले,""ही टीका नाही. त्यांनी माझ्या राजकारणात येण्याचे वर्णन केलं असावं; त्यांच्या व्याख्येप्रमाणे. लोक असं काहीतरी बोलत असतात. सगळ्यांच्याकडंच लक्ष द्यायचं असतं असं नाही. पण मघाशी बारा साडेबारा वाजता ते मला सांगलीत डीपीडीसीत दिसले. मी जेव्हा तिथून निघालो तेव्हा तरी मला बरे दिसले.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political opportunity for Jayantarao due to compassion principle: Padalkar