सांगली : जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यावर हल्ला! सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

अध्यक्षांच्या पतीची मारहाणीची तक्रार; दुसऱ्या गटाकडूनही आरोप
sangli zilha parishad
sangli zilha parishadsakal media

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, सदस्यांमधील धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली. त्याचे पर्यवसन आज रात्री नऊच्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात तोडफोड (Attack in ZP President bunglow) , मारहाणीत झाले. यावरून दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप झाले असून, रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात (vishrambaug police station) तक्रार देण्याचे काम सुरू होते. गेले काही महिने जिल्हा परिषदेत धुसफूस सुरू आहे. स्वीय निधी वाटपात अन्याय झाल्यावरून सदस्यांमध्ये असंतोष आहे. तसेच सर्वसाधारण सभा ऑनलाईन (online meeting) घेण्यास सदस्यांचा विरोध आहे. मंगळवारी (ता. २५) जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही सदस्यांनी दिला आहे.

sangli zilha parishad
एकाच रात्री सहा दुकाने फोडली; उल्हासनगरातून २४ तासांत त्रिकुटाला अटक

आज रात्री जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ‘वसंत’ बंगल्यात अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे पती नंदकुमार कोरे, दीर राजू कोरे, जि. प. सदस्य रवी तम्मनगौडा आणि इतर काहीजण चर्चा करत बसले होते. रात्री नऊच्या सुमारास बंगल्यात समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, सदस्य संभाजी कचरे, अरूण बालटे, महिला बालकल्याण सभापती सुनिता पवार यांचे पती सुनिल पवार आणि आरोग्य सभापती आशा पाटील यांचे पती सुनिल पाटील हे बंगल्यात आले. समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात जुंपली. वादावादी आणि शिवीगाळ झाली. यावेळी नंदकुमार कोरे, राजू कोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यांनीही प्रतिकार करून समजावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत खुर्च्या फेकल्या, कुंड्या फोडून टाकण्यात आल्या. हा गोंधळ ऐकून बंगल्याभोवती गर्दी झाली. विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, नंदकुमार कोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘वॉटर एटीएमच्या एका टेंडरवरून वाद होता. पाच कोटींचे टेंडर होते. हे टेंडर पुण्याच्या ठेकेदाराने १७ टक्के कमी दराने भरले आहे. मात्र या ठेकेदारास आम्ही जाणीवपूर्वक हे काम देत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या वादातून हा प्रकार घडला आहे. सभापती शेंडगे यांच्यासह पाचजण रात्री नऊच्या सुमारास बंगल्यात आले. त्यातील काहींनी मद्यप्राशन केले होते. त्यांनी आम्हाला मारहाण, शिवीगाळ करून बंगल्यात तोडफोड केली. जीवे मारण्याची धमकी दिली.’’

सभापती शेंडगे म्हणाले, ‘‘अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी निधी वाटपात अन्याय केला आहे. जादा निधी स्वत:कडे ठेवला आहे. वॉटर एटीएमचा ठेका घेण्यासाठी शेवटची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा घाट घातला आहे. महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून न आणता ऑनलाईन सभेत मंजुरी दिली जाणार होती. ऑनलाईन सभेला आमचा विरोध आहे. त्यामुळे आम्हाला चर्चेसाठी बोलवून घेतले होते. त्यावेळी आम्हाला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. जीवे मारण्याची धमकी दिली. अध्यक्षांच्या पती व दीरानेच बंगल्यात कुंड्या फोडून तोडफोड केली.’’

दोन्ही गट पोलीस ठाण्यात

नंदकुमार कोरे यांनी पोलिस ठाण्यात आल्यानंतर जबाब दिला; तर पाठोपाठ प्रमोद शेंडगे, सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले हे तिघेही तेथे आले. त्यांनी कोरे यांच्याविरोधात तक्रार देणार असल्याचे सांगितले. परंतु दोन्ही गटांना राजकीय नेत्यांचे वारंवार फोन सुरू होते. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर होत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com