गोकुळ दुध संघामध्ये आता कोण कोणासोबत ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ "गोकुळ'वर पी.एन.-महाडिक यांची सत्ता आहे. गेल्या दहा वर्षांपासून श्री. महाडिक यांची संघावरील सत्ता संपुष्टात आणण्याचे प्रयत्न आमदार पाटील यांच्याकडून सुरू आहेत.

कोल्हापूर - जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेला कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याचा मुद्दा संपला असला तरी प्रत्यक्षात निवडणुकीत कोण कोणासोबत असेल, यावरच निवडणुकीतील चुरस अवलंबून आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना संघात रोखण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्यासह महाडिक विरोधक एकवटले असून, त्यात आमदार पी. एन. पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ "गोकुळ'वर पी.एन.-महाडिक यांची सत्ता आहे. गेल्या दहा वर्षांपासून श्री. महाडिक यांची संघावरील सत्ता संपुष्टात आणण्याचे प्रयत्न आमदार पाटील यांच्याकडून सुरू आहेत. संघाच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्व महाडिक विरोधकांना एकत्र करून श्री. पाटील यांनी हा गड भेदण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना पूर्णतः अपयश आले नाही. दोन जागा जिंकून त्यांनीही आपली ताकद दाखवून दिली. एवढेच नव्हे तर पराभूत जागा ह्या अतिशय कमी मतांनी पराभूत झाल्याने सत्ताधाऱ्यांच्यादृष्टीने तो धोक्‍याचा इशाराही समजला गेला. 

काश्‍मीरमधील शेतकऱ्यांच्या भेटीनंतर राजू शेट्टी म्हणाले, 

कोण कोणासोबत असेल? 

सत्ताधारी गटासोबत

सत्ताधारी गटासोबत आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, बजरंग देसाई, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, संजय घाटगे, माजी अध्यक्ष दिलीप माने-पाटील. 

विरोधकांसोबत 
आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. विनय कोरे, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील. 

"गोकुळ'च्या विद्यमान संचालकांची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच गेल्यावर्षी संघ मल्टिस्टेट करण्याचा घाट घालण्यात आला. संघाच्या कार्यक्षेत्राबरोबर दूध संकलन वाढवणे, हा त्यामागचा उद्देश असला तरी संघ आपल्याच ताब्यात रहावा, ही खेळीही त्यामागे होती, असा आरोप विरोधकांनी सुरू केला. त्यातून जिल्हाभर याविरोधात रान उठवण्यात आले. मोर्चा, प्रतिमोर्चा, आंदोलने यातून जिल्ह्याच्या राजकीय पटलावर "गोकुळ' आणि महाडिक-पाटील वादाचीच चर्चा वर्षभर रंगली. त्याचे परिणाम अधिक प्रमाणात लोकसभा आणि विधानसभेतही दिसले. त्यातून शहाणे झालेल्या सत्ताधाऱ्यांनी संघच मल्टिस्टेट न करण्याचा निर्णय घेतला. त्यात सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांचा आग्रह होता, त्यानुसार संचालक मंडळांसह नेत्यांनीही हा विषय रद्द करून या विषयावरील चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी खरी लढाई निवडणुकीत कोण कोणासोबत जाईल, यावरच अवलंबून आहे. 
संघाचे नेतृत्व पी. एन. यांनी करावे, यासाठी आमदार पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ प्रयत्नशील आहेत.

कोल्हापूर शहरात पुन्हा येणार महिलाराज 

पी. एन. विरोधात गेले तर...

गेली अनेक वर्षे श्री. महाडिक यांचे नेतृत्व मानणाऱ्या काही ज्येष्ठ संचालकांचीही हीच भूमिका आहे. तथापि, पी. एन. यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पी. एन. विरोधात गेले तर सत्ता जाण्याचा धोका श्री. महाडिक यांनाही आहे. त्यामुळेच पी. एन. यांना कोणत्याही परिस्थितीत दुखवायचे नाही, अशी खेळी श्री. महाडिक यांच्याकडून सुरू आहे. दुसरीकडे नेतृत्व आपल्याकडे येईल; पण आमदार पाटील सांगतील त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल, ही अडचणही पी. एन. यांच्यासमोर आहे. त्यामुळे तेही श्री. महाडिक यांच्या विरोधात जाऊन काय करतील, अशी शक्‍यता सध्यातरी दिसत नाही. 

संचालक मंडळात मल्टिस्टेटचा निर्णय मागे घेतल्याने पुन्हा सर्व संचालक आहे त्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याच्या मानसिकतेत आहे. त्याचबरोबर महाडिक, पी. एन. यांचा कारभारात असलेला मर्यादित हस्तक्षेप हीसुध्दा संचालकांच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. या सर्व बाबींचा विचार करताना पी. एन. यांचीच भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. 

नरकेंच्या उमेदवारीवरून संघर्ष अटळ 
निवडणुकीत ज्येष्ठ संचालक अरुण नरके किंवा त्यांचे पुत्र चेतन यांच्या उमेदवारीवरून संघर्ष अटळ आहे. श्री. नरके यांच्या उमेदवारीला पी. एन. यांचा तीव्र विरोध राहील, यामागे विधानसभेचे राजकारण आहे. त्यातही चेतन यांच्या उमेदवारीऐवजी संदीप यांना उमेदवारीला पी. एन. यांचा एखादवेळी ग्रीन सिग्नल मिळू शकतो. अशीच परिस्थिती ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांच्या उमेदवारीवरून उद्‌भवू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics In Gokul Milk Federation Special Report