पक्षातूनच फितुरी; राजहंसगड फलकावरुन राजकारण; मराठी भाषिकांतून संताप 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

जहंसगड मराठी फलक प्रकरणात मराठी भाषिकांची एकजूट अपेक्षित आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षात असलेल्या राजहंसगड परिसरातील काही मराठी भाषिकांनी आता विरोधी भूमिका घेण्यास सुरवात केली आहे.

बेळगाव - राजहंसगड मराठी फलक प्रकरणात मराठी भाषिकांची एकजूट अपेक्षित आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षात असलेल्या राजहंसगड परिसरातील काही मराठी भाषिकांनी आता विरोधी भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. दोन वर्षापूर्वी राजहंसगडावर तत्कालीन आमदार संजय पाटील यांनी मराठीत फलक उभारला होता. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी अलीकडेच पायथ्याशी स्वखर्चाने स्वागत कमान उभारणीचे काम सुरु केले आहे. आता गडावरील मराठी फलक काढून स्वागत कमानीचे काम थांबविण्यासाठी एका पक्षाचे कार्यकर्तेच अधिकाऱ्यांकडे फितुरी करु लागल्याने संताप व्यक्‍त होत आहे. 

हे पण वाचा -  मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांपुढे कोणते मोठे आव्हान...? 

केवळ एका पक्षाकडून गडावर मराठीत फलक लागला म्हणून काहींनी हा फलक काढण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र, एकदा का हा फलक काढल्यास त्याठिकाणी पुन्हा मराठी फलक लागणार का, असा प्रश्‍न आहे. राज्य सरकारकडून कन्नडच्या अंमलबजावणीसाठी सुरु असलेला आटापीटा पाहता येळ्ळूर व राजहंसगड परिसरातही कन्नडसक्तीचे वारे वाहू लागले आहे. फलक प्रकरण केवळ निमित्त ठरले आहे. राजहंसगडाच्या विकासाला माजी आमदार पाटील यांच्या कार्यकाळात सुरवात झाली. पण, गडावरील माती व अन्य प्रकरणांमुळे हा विकास रखडला. 

हे पण वाचा - कोरोना व्हायरसची बेळगाव ने घेतलीय धडकी.... -

बेळगाव सुवर्णसौध बांधल्यानंतर राजहंसगडावर 65 फुटी शिवरायांचा पुतळा बसविण्याच्या हालचालीही गतिमान झाल्या. मात्र, त्याची पूर्तता आता झाली असून शासनाने त्यासाठी 50 लाखाचे अनुदान मंजूर केले आहे. बेळगावकरांसाठी ही चांगलीच गोष्ट होती. पुतळा उभारणीसह गडाचा विकासही होणार आहे. त्यामुळे, राजहंसगडावर शिवभक्तांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा पार पडला. हा कार्यक्रम एका पक्षाचा नव्हता. पण, कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठावरील मराठी फलकाचा मुद्दा एक स्वयंघोषित कन्नड नेत्याने उकरुन काढला. राजहंसगडावर कन्नड कार्यकर्तेच कन्नड फलक लावतील, अशी दर्पोक्‍तीही केली. त्याची दखल घेऊन कन्नड विकास प्राधीकरणाने चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी सुरु असतानाच काहींनी राजकीय पोळी भाजण्यासाठी गडावर लावलेला फलक आपल्याला विश्‍वासात घेऊन लावलेला नसल्याने तो काढावा, अशी माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांच्या नियोजित स्वागत कमानीच्या बांधकामातही अडथळा आणण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे, या भागातून संताप व्यक्‍त होत आहे. 

ऐकोपा धोक्‍यात 
राजहंसगड गावात 95 टक्के मराठी तर केवळ 5 टक्के कन्नड भाषिक लोक राहतात. दोन्ही भाषिक गुण्यागोविंदाने राहातात. मात्र, राजकारणामुळे आता राजहंसगडावर मराठी टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे गावचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: politics from the rajhansgad panel in belgium