निसर्गासाठी प्रदूषणकारी व्यवस्था मोडावी लागेल : डॉ. भारत पाटणकर

विजय लोहार
Sunday, 24 January 2021

निसर्गाला उद्‌ध्वस्त करणारी प्रदूषणकारी व्यवस्था मोडून नवी व्यवस्था आणावी लागेल त्यासाठी श्रमिक मुक्ती दल सातत्याने प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन कासेगाव (ता. वाळवा) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

नेर्ले (जि. सांगली) : निसर्गाला उद्‌ध्वस्त करणारी प्रदूषणकारी व्यवस्था मोडून नवी व्यवस्था आणावी लागेल त्यासाठी श्रमिक मुक्ती दल सातत्याने प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन कासेगाव (ता. वाळवा) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले,""गेली अनेक वर्षे श्रमिक मुक्ती दलाने कष्टकऱ्यांच्या अनेक चळवळी केल्या, यामागे श्रमुदची महत्त्वाची भूमिका होती. नवा शोषण मुक्त समाज निर्माण करायचा असेल तर वर्ग, जात आणि लैंगिक शोषणाच्या पायावर उभा राहिलेली निसर्गाला उद्‌ध्वस्त करणारी प्रदूषणकारी व्यवस्था मोडून नवी व्यवस्था आणावी लागेल. त्यासाठी शेती आणि शेतीवर आधारलेले नवे कृषी औद्योगिक धोरण घ्यावे लागेल. नव्या तंत्रविज्ञानाच्या आधारे आजच्या भांडवली उत्पादन व्यवस्थेचा पराभव करून नवी व्यवस्था समतेवर आधारलेली उत्पादन व्यवस्था आणता येते हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. कोरोना महामारीने ते अधिक स्पष्ट केले आहे. 

आपण पाहिलं कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक मृत्यू हे शहरी भागात झाले. सर्व उद्योग थांबले, रोजगार थांबला, अशा काळात शेतीने तारले. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपा सारखे धोरण सार्वत्रिकपणे राबविले तर शेती उत्पादनात वाढ होऊन घसरत्या जीडीपीला उत्तर देता येईल. वारा, सूर्यप्रकाश, समुद्र, पाणी, जंगल या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून नवे पर्यावरण संतुलित रोजगार निर्माण होऊ शकतात. त्यासाठी आजच्या भांडवली व्यवस्थेचा पराभव करण्यासाठी नवा संघर्ष संघटित करावा लागेल.''

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, मोहनराव यादव, डॉ. प्रशांत पन्हाळकर, ऍड. कृष्णा पाटील, जयंत निकम, मोहन अनपट, चैतन्य दळवी, अंकुश शेडगे, मारुती पाटील, शरद जांभळे, दिलीप पाटील, सुधीर नलवडे, डी. के. बोडके यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते हजर होते. 

आंदोलनांवर चर्चा 
श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याला अभिवादन करून क्रांतिकारक गीताने अधिवेशनाला सुरवात झाली. संतोष गोटल यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कॉ. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. यानंतर गेल्या वर्षभरातील मुख्य अंदोलनांवर चर्चा झाली. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polluting system has to be broken for nature: Dr. Bharat Patankar