pomogranate
pomogranate

थेट उपायोजना नाही, डाळिंब उत्पादक नाराज

आटपाडी ः डाळिंब शेतीला हंगाम धरण्यापासून ते ग्राहक, विक्रीची साखळी मोडून पडल्यामुळे मोठा फटका बसला आहे. "कोरोना' च्या पार्श्‍वभूमिवर डाळिंब उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात केंद्राने जाहीर केलेल्या कृषिपूरक पॅकेजमध्ये जुनीच व्याज सवलत योजना, शीतगृह आणि प्रक्रिया उद्योगाची घोषणा केली. डाळिंब उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि नवीन निर्माण होणारी समस्या सोडवण्यासाठी थेट उपायोजना नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे.


देशात सर्वाधिक महाराष्ट्रातून डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. यातही कमी पाऊस असलेल्या आटपाडी, सांगोला, माण या माणदेशासह नागपूर भागात डाळिंब पिकवले जाते. माणदेशातील डाळिंब अत्यंत दर्जेदार असल्यामुळे परदेशातून मोठी मागणी असते. युरोपियन राष्ट्रांनाही या भागातून डाळिंबे निर्यात केली जातात. कमी पाऊस आणि दुष्काळी भागाला डाळिंबाने तारले. अलीकडे डाळिंब उत्पादकांना विविध प्रकारचे नवनवीन येणारे रोग आणि कमी होत चाललेले दर या समस्यांला तोंड द्यावे लागत आहे. "कोरोना' मुळे निर्माण झालेल्या अडचणींची भर पडली आहे.


"कोरोना' मुळे संचारबंदी लागू आहे. डाळिंब विक्रीची व्यवस्था मोडकळीस आली. साहजिकच दर पडले. विक्रीची समस्या आहे. मृग हंगामात बागा धरण्यायासंदर्भात शेतकऱ्यांत संभ्रम आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि भारतातून दुबई, सौदी अरेबिया, इराण, ऑस्ट्रेलियासह युरोपिन राष्ट्रांना डाळिंबाची निर्यात सुरू होणार का? या प्रश्नाने शेतकरी, व्यापाऱ्यांना घेरले आहे. भरमसाठ खर्च करून उत्पादन घेतल्यावर बाजारपेठ न मिळाल्यास मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे.


केंद्राने शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमधून डाळिंब उत्पादकांना थेट कसलाही लाभ जाहीर झालेला नाही. डाळिंब विक्री, खरेदीची हमी दिलेली नाही. नुकसान झालेल्या डाळिंब उत्पादकांना थेट दिलासा मिळालेला नाही. शीतगृहाला प्रोत्साहनसाठी योजना जाहीर केली. त्याचाच काही तो अप्रत्यक्ष उपयोगी होईल. पिक कर्जात तीन टक्के मे अखेर कर्ज भरणाऱ्यांना सवलत जाहीर केली. ही योजना पूर्वी होतीच. फक्त यात दोन महिन्यांची मुदतवाढ दिली. प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी चालना देण्याची घोषणा केली. मुळात डाळिंबावर प्रक्रिया करणारे फारसे उद्योग नाहीत. जे उभा राहिले त्यांनाही ग्राहकांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगात किती मोठी भर पडेल याबद्दलही प्रश्नच आहे.

""कोरोनामुळे डाळींब उत्पादकांचे झालेले आणि होणारे संभाव्य नुकसान, बाजारपेठेची आणि भावाची हमी यासंदर्भात केंद्राच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना कसलाही दिलासा मिळालेला नाही.''

-आनंदराव पाटील (अध्यक्ष-माणगंगा डाळिंब उद्योग समूह)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com