
डाळिंब विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा असल्याने डाळिंबाचे दर तेजीत आहेत.
आटपाडी (जि. सांगली) ः डाळिंब विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा असल्याने डाळिंबाचे दर तेजीत आहेत. नामवंत व्यापारी डाळिंब मिळवण्यासाठी छोट्या-छोट्या शेतकऱ्यांच्या बांधावर फिरू लागलेत. भगव्या डाळिंबाचे दर सरासरी 70 ते 100 रुपये दरम्यान आहेत.
मे महिन्यामध्ये इथेनॉल मारलेल्या डाळिंबाची फळे विक्रीसाठी आली आहेत. मात्र यावर्षी प्रचंड पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक बागा पूर्ण वाया गेल्या आहेत; तर अनेक बागाचे तीस-चाळीस 50 टक्के नुकसान झाले.
अशीच स्थिती जून आणि जुलैमध्ये धरलेल्या डाळिंबाची आहे. हंगाम सुरू होऊनही बाजार पेठेत डाळिंबाची आवक अत्यंत कमी सुरू झाली. सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. उत्तर भारतीतील छठ पूजाही तोंडावर आली आहे. डाळिंबाची मागणी वाढत चालली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत डाळिंब मिळत नाही.
दरवर्षी यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणावर डाळिंब उपलब्ध होतो. मात्र यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत 25 टक्केही माल मिळत नाही. अनेक मोठे नामवंत व्यापारी छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या बांधावर डाळिंबासाठी फिरू लागले आहेत. सध्या डाळिंबाचे सरासरी 70 ते 100 रुपये प्रतिकिलो दर सुरू आहेत.
ग्रेड वन डाळिंबाचे प्रतिकिलो शंभर रुपये दर आहेत. गेल्या दोन दिवसांत दरामध्ये 10 ते 15 रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. तोंडावर छटपूजा आल्यामुळे आणखी 10 ते 15 रुपये दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
चांगल्या मालाचे प्रमाण कमी
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात ग्रेड तीन आणि चार मधील भावात मोठी उसळी झाली आहे. अत्यंत लहान आणि हिरव्या कच्चा गोठ्यांनाही 40 ते 50 रुपये दर मिळत आहे. आच्छादन नसलेली फळे पावसाच्या माऱ्यामुळे खराब झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर डांबऱ्या आणि कुजवा लागलेलाच माल येतो आहे. चांगल्या मालाचे प्रमाण फारच कमी झाले आहे.
संपादन : युवराज यादव