"पोस्टा' तील योजनांवर व्याजदर कपातीचा शिक्का...चालू आर्थिक वर्षात 1.4 टक्केपर्यंत व्याजदर कमी 

post.jpg
post.jpg

सांगली-  पोस्टाच्या विविध अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 0.70 ते 1.40 टक्के कपात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झाली आहे. त्यामुळे बॅंकांपेक्षा "पोस्ट' खात्यावर अधिक विश्‍वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता याची झळ पोहोचली आहे. पोस्टामध्ये सर्वाधिक व्याजदर असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत गेल्या पाच वर्षात 9.20 टक्के व्याजदरावरून सध्या 7.6 टक्के पर्यंत घसरण झाली आहे. 

बॅंकांच्या तुलनेत पोस्टाच्या अल्पबचत योजनामध्ये व्याजदर थोडा अधिक असल्यामुळे त्यामध्ये अधिक गुंतवणूक केली जात होती. तसेच शतकोत्तर इतिहास असलेल्या पोस्टावर आजही सामान्य लोकांचा अधिक विश्‍वास आहे. काही योजनांमध्ये बॅंकांपेक्षा थोडे व्याज कमी असले तरी विश्‍वासामुळे आजही अनेकजण "पोस्टा' तच गुंतवणूक करतात. ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेकांची वर्षानुवर्षे पोस्ट खात्याशी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे पोस्टाच्या गुंतवणूक योजना आजही लोकप्रिय आहेत. मात्र गेल्या वर्ष-दोन वर्षात पोस्टातील विविध योजनांच्या व्याजदरात होत असलेली कपात सामान्यांना चिंता करायला लावणारी ठरत आहेत. 

पोस्टाच्या आर.डी. अर्थात आवर्ती जमा खात्यामध्ये यापूर्वी 7.2 टक्के व्याज मिळत होते. त्यामध्ये 1.40 टक्केने कपात झाली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून 5.8 टक्के व्याजदराने परतावा मिळणार आहे. पाच वर्षापूर्वी यामध्ये 8.40 टक्के व्याज मिळत होते. "टाईम डिपॉझिट' अर्थात मुदत ठेव योजनेतही कपात झाली आहे. एक ते तीन वर्षापासाठी 5.5 टक्‍के व्याज तर पाच वर्षासाठी 6.7 टक्के व्याज आता मिळणार आहे. "एमआयएस' अर्थात मासिक उत्पन्न योजनेत पाच वर्षाच्या मुदतीसाठी यापूर्वी 7.6 टक्के व्याज होते. त्यामध्ये एक टक्का कपात होऊन 6.6 टक्के व्याज मिळणार आहे. पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या 15 वर्षे मुदतीच्या योजनेसाठी 7.1 टक्के व्याज लागू केले आहे. वरिष्ठ नागरिक बचत योजनेत गतवर्षापर्यंत 8.6 टक्के व्याज होते. त्यात 1.2 टक्के कपात होऊन 7.4 टक्के व्याज लागू केले आहे. पाच वर्षाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत पाच वर्षासाठी 7.9 टक्केवरून 6.8 टक्के कपात करण्यात आली आहे. तर किसान विकासपत्र या 124 महिन्याच्या योजनेत 7.6 टक्केवरून 6.9 टक्के व्याजदर केला आहे. 

पालकांना देखील चिंता- 
मुलींसाठी सहा वर्षापूर्वी सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत 2015 मध्ये सर्वाधिक 9.2 टक्के इतका व्याजदर होता. त्यामुळे अनेकांनी मुलींच्या नावाने पोस्टात खाते सुरू करून गुंतवणूक सुरू केली. परंतू गेल्या पाच वर्षात हळूहळू कपात होत आली आहे. गतवर्षी 8.4 टक्के व्याजदर होता. तो आता 7.6 इतका कमी झाला आहे. त्यामुळे योजनेत गुंतवणूक केलेल्या पालकवर्गात कमी होणाऱ्या व्याजदराबाबत चिंता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com