महाबळेश्‍वर रस्त्यावर खड्डेच खड्डे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

 पर्यटनस्थळांशेजारील रस्त्यांची चाळण झाल्याने छाेटे-छाेटे अपघात हाेताहेत.

भिलार  : पाचगणी- महाबळेश्‍वर मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. पर्यटन स्थळांशेजारील रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाल्याने पर्यटक व वाहनचालक या खड्डे प्रवासाला कंटाळले आहेत. 

या रस्त्यावरील खड्ड्यांच्या आजाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरमाची मलमपट्टी केली; पण या तात्पुरत्या इलाजाने रस्ता केवळ दोन दिवस दुरुस्त झाला; परंतु तो पुन्हा आहे त्या स्थितीत आहे. दांडेघर बस स्थानक, शेरबाग, पोलिस ठाणे, पाचगणी बस स्थानक, किमिन्स स्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोंबडा बिडी बंगलो, संजीवन नाका, नारायण लॉज, पांगारी फाटा, भोसे खिंड, गुरेघर, मेटगुताड, लिंगमळा, हिरकणी बाग या ठिकाणांवर तर या रस्त्याची वाट लागली असून, या खड्ड्यातून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्याच्या प्रवासाने बऱ्याच पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने या खड्ड्यात आपटल्याने गाड्यांचे नुकसान होत आहे. या खड्ड्यातून उडालेल्या पाण्याचा त्रास पादचाऱ्यांना घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिकही या खड्ड्यांना त्रस्त झाले आहेत. एक खड्डा चुकवताना गाडी दुसऱ्या खड्ड्यात जात असून, मुसळधार पावसात या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्‍न प्रवाशी विचारत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र "हाताची घडी आणि तोंडावर बोट' या स्थितीतच वावरत आहेत. पाऊस थांबताच पर्यटनाचा हंगाम सुरू होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यांवर कायमची मलमपट्टी करून रस्ता निर्धोक करावा, अशी मागणी पर्यटक, वाहनचालक व नागरिकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Potholes on Mahabaleshwar road