गोष्ट टायर पळवणाऱ्या आजोबांची...(व्हिडिओ)

अशोक तोरस्कर
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

उत्तूरमधील (ता. आजरा) प्रभाकर बळवंत बेडगे हे ८२ वर्षीय आजोबा मात्र वयाच्या ३० व्या वर्षांपासून सातत्याने व्यायाम करतात. तोही अगदी साध्या टायरसोबत धावण्याचा. याचा परिपाक म्हणजे त्यांना या वयातही साखर, रक्तदाब नाही. शिवाय नजरही व्यवस्थित आहे.

उत्तूर - सध्या फिटनेस राखण्याकडे कल वाढला आहे. यासाठी डायट प्लॅनपासून वर्क आऊट करण्याकडे लोक वळले आहेत; मात्र यात सातत्य राखण्यात खूप कमी जणांना यश येते. व्यायाम हा जीवनशैलीचा भाग आहे. हे अद्याप आपल्याकडे रूळलेले दिसत नाही. याला अपवाद नक्कीच आहेत; पण अशांची संख्या खूप कमी आहे.

उत्तूरमधील (ता. आजरा) प्रभाकर बळवंत बेडगे हे ८२ वर्षीय आजोबा मात्र वयाच्या ३० व्या वर्षांपासून सातत्याने व्यायाम करतात. तोही अगदी साध्या टायरसोबत धावण्याचा. याचा परिपाक म्हणजे त्यांना या वयातही साखर, रक्तदाब नाही. शिवाय नजरही व्यवस्थित आहे.

प्रभाकर यांचे शिक्षण ७ वीपर्यंत झाले आहे. लहानपणापासून व्यायामाची आवड; मात्र तालमीत जाऊन व्यायाम करणे त्यांना जमले नाही. साधा, सोपा कोणताही खर्च नसलेल्या टायरबरोबर पळणे या व्यायामाची त्यांना आवड निर्माण झाली. त्यांचे वडील टेलर काम करायचे. वडिलांचा व्यवसाय त्यांनी पुढे चालू ठेवला. यामध्ये प्रगती करून शिलाई मशीन दुरुस्तीच्या व्यवसायात जम बसवला. टायरसोबत पळण्याची सवय त्यांनी अखंड सुरू ठेवली. उत्तूर ते बेलेवाडी दरम्यानचा चिकोत्रा नदीवरील पूल हे ७ कि.मी. अंतर ते धावायचे. कधी सकाळी तर कधी सायंकाळी ते धावताना अनेकांना दिसतात. दोन्ही मुलांच्या दोन मोटारसायकली आहेत. वडिलांनी सांगितले तर मुले त्यांना जेथे हवे तेथे आणून सोडतील; पण शक्‍यतो सर्व कामे ते पायी चालून करतात. चालणे, धावणे हा चांगला व्यायाम आहे आणि तो नियमित झाला पाहिजे एवढेच त्यांना माहीत आहे.

धावताना हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो. साहजिकच हृदयाकडून इतर अवयवांना पोचले जाणारे रक्त आणि ऑक्‍सिजन पुरवठा चांगला होतो. नियमित धावल्याने ठोके व्यवस्थित पडतात. यामुळे हृदय अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते.
- डॉ. दिनेश चव्हाण,
हृदयरोगतज्ज्ञ

शाकाहारी आणि निर्व्यसनी
ते शाकाहारी आहेत. कुठलेही व्यसन त्यांनी केले नाही. वयाची ८२ वर्षे ओलांडली तरी चष्मा न लावता वाचतात. शिलाई मशीनचा छोटा पार्टही त्यांना सहज दिसतो. रक्तदाब, साखरेला थारा नाही. आजही मशीन दुरुस्तीतून त्यांची स्वकमाई सुरू आहे. धावायला कुठलं ट्रेनिंग घ्यावं लागत नाही. पैसे लागत नाहीत. फक्त इच्छा आणि छंद पाहिजे. प्रभाकर बेडगे यांनी तो जोपासला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prabhakar Bedge health story special