पक्षाच्या आमदाराला पाडणाऱ्यालाच भाजपने घेतले सोबत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

सरकार स्थापन करताना शिवसेनेकडून सुरू असलेले दबावाचे राजकारण आणि अपुरे बहूमत यामुळे भाजपलाही अपक्षांची गरज आहे. त्यातून आज श्री. आवाडे हेच भाजपच्या गळाला लागले.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचा दणदणीत पराभव करून विजयी झालेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज भाजपला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे श्री. आवाडे यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपत घेणार नाही असे इचलकरंजीच्या सभेत जाहीर केलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच श्री. आवाडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. 

इचलकरंजी विधानसभा मतदार संघात सलग दोन निवडणुकीत श्री. हाळवणकर यांनी श्री. आवाडे यांचा पराभव केला होता. त्यावेळी श्री. आवाडे हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. श्री. हाळवणकर हे यावेळी हॅटट्रीक' च्या तयारीत होते, त्यात विजयी झाले असते तर मंत्रीपदाचे प्रमुख दावेदारही होते. पण कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन श्री. आवाडे यांनी अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली. 

इचलकरंजी ही वस्त्रनगरी आहे, या नगरीतील या वस्त्रोद्योगच्या आजच्या अवस्थेला सरकारच प्रतिनिधी म्हणून श्री. हाळवणकर हेच जबाबदार असल्याचे मत श्री. आवाडे यांनी मतदार संघात बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गेली अनेक वर्षे सत्तेत असूनही शहरातील काही प्रलंबित कामांचा फटका श्री. हाळवणकर यांना बसला. त्यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांचीही निवडणुकीपुर्वी एक सभा झाली होती. प्रचाराचा सभेत तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्री. आवाडे भाजपमध्ये आल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही असे जाहीर वक्‍तव्य केले होते. 

सरकार स्थापन करताना शिवसेनेकडून सुरू असलेले दबावाचे राजकारण आणि अपुरे बहूमत यामुळे भाजपलाही अपक्षांची गरज आहे. त्यातून आज श्री. आवाडे हेच भाजपच्या गळाला लागले. मंत्री पाटील यांच्या इशाऱ्यामुळे श्री. आवाडे हे सुरूवातीला शिवसेनेसोबत जातील, अशी शक्‍यता होती, त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचीही भेट घेतल्याची चर्चा होती. पण आज मुंबईत मंत्री पाटील यांच्याच उपस्थितीत श्री. आवाडे यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे देऊन एकप्रकारे श्री. हाळवणकर यांनाच शह दिल्याचे बोलले जाते. 

हाळवणकरांचे "नो कॉमेंट्‌स' 

या घडामोडीबाबत श्री. हाळवकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Awade Support To BJP Meets Devendra Fadnavis