
महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची निवड झाल्याने तासगाव तालुका आणि सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
तासगाव (जि. सांगली) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची निवड झाल्याने तासगाव तालुका आणि सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. पाटील हे मूळचे तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील आहेत. कुलगुरूपद भूषवणारे ते तालुक्यातील पहिली व्यक्ती ठरले आहेत.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. के. पी. विश्वनाथ यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार 4 नोव्हेंबर 2020 पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. लक्ष्मण सिंह राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह आणि राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवळे हे समितीचे सदस्य होते.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक म्हणून डॉ. पाटील सध्या काम करत होते. त्यांचे आई-वडील मूळचे कवठेएकंदचे, मात्र पेशाने दोघेही शिक्षक असल्याने ठाणे जिल्ह्यात वास्तव्य होते. शिक्षण ही तिकडेच झाले. डॉ. पाटील यांनी फुले विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी या विषयात बीटेक पदवी प्राप्त केली. त्यानंतर आयआयटी-खरगपूर येथून एमटेक आणि नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच. डी मिळविली.
डॉ. पाटील हे मुंबई येथे काम करत असले तरी त्यांची कवठेएकंद ह्या आपल्या गावाशी असलेली नाळ कधी तुटली नाही. ते वर्षभरात अनेकदा गावाकडे येऊन जात असतात. गावातील नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी त्यांचा नेहमी संपर्क असातो. त्यांची कुलगुरुपदी निवड झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना कवठेएकंदचे ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक मधुकर पाटील यांनी आमच्या गावचा माणूस कुलगुरू झाला याबद्दल आनंद वाटतोय, यापूर्वीही मोठ्या पदावर असूनही त्यांनी गावाच्या मातीशी असलेले नाते तोडले नव्हते असे सांगितले.
डॉ. पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी या विषयात बी. टेक. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम. टेक. आणि त्यानंतर नागपूर येथील "व्हीएनआयटी' येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे.
संपादन : युवराज यादव