काकानेच दिला प्रतीकचा नरबळी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

सोलापूर - महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या घटनांचा अभ्यास करून माचणूर (ता. मंगळवेढा) येथील अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण (वय ९) याचा नरबळी दिल्याचे पोलिसांनी समोर आणले आहे. दीर्घकालीन आजारातून बरे व्हावे आणि धनप्राप्ती व्हावी यासाठी प्रतीकचा नरबळी देण्यात आला. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून प्रतीकचा काका भारत दगडू शिवशरण व संत दामाजीपंत साखर कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब पिराजी डोके यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूर - महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या घटनांचा अभ्यास करून माचणूर (ता. मंगळवेढा) येथील अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण (वय ९) याचा नरबळी दिल्याचे पोलिसांनी समोर आणले आहे. दीर्घकालीन आजारातून बरे व्हावे आणि धनप्राप्ती व्हावी यासाठी प्रतीकचा नरबळी देण्यात आला. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून प्रतीकचा काका भारत दगडू शिवशरण व संत दामाजीपंत साखर कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब पिराजी डोके यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली. 

माचणूरमधील मधुकर दगडू शिवशरण यांचा नऊ वर्षांचा मुलगा प्रतीक याचे २७ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सायंकाळी शाळेच्या पटांगणातून अपहरण झाले होते. या प्रकरणी २८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरण झालेल्या प्रतीकचा शोध घेत असताना १ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह माचणूर येथील सिद्धेश्‍वर मंदिर समोरील महादेव डोके यांच्या उसाच्या शेतात मिळाला होता. नदीपात्राकडे जाणाऱ्या घाटावर जळालेल्या अवस्थेतील काळ्या रंगाचे कापड, अर्धवट जळालेले कागदाचे तुकडे, अंडरवेअर पोलिसांना सापडले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुरवातीला १७ वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. त्यातून प्रतीकचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले होते. 

या प्रकरणात संशयावरून पोलिसांनी भारत दगडू शिवशरण याच्या घराची झडती घेतली. घरात पाच प्राणघातक हत्यारे व गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या वस्तूंशी साम्य दिसून आले. तपासासाठी त्याला ३० नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. त्याच्या तपासातून संत दामाजीपंत साखर कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब पिराजी डोके याचे नाव समोर आले. डोके यास पॅरेलेसीस आजार आहे. तसेच, कुटुंबातील अन्य सदस्यही दुर्धर आजाराने ग्रासले आहेत. आजारातून सुटका मिळविण्यासाठी तो धार्मिक विधीसाठी कोल्हापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि सांगली येथे जात असल्याचे समोर आले. नानासाहेब डोके व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आजारातून बरे वाटावे तसेच धन प्राप्ती व्हावी यासाठी भारत शिवशरण व त्याच्या अल्पवयीन मुलाने प्रतीकचा बळी दिल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे. नरबळी असल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार कलम समाविष्ट करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

यांनी केला तपास
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलिस निरीक्षक अनिल गाडे, सहायक पोलिस निरीक्षक मानगावे, पोलिस उपनिरीक्षक पुजारी, प्रीती जाधव, मीना मरे, स्थानिक गुन्हे शाखेकडील अल्ताफ काझी, नारायण गोलेकर, रवी माने, लालसिंग राठोड, सचिन गायकवाड, मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील सहायक फौजदार जमादार, तोंडले, क्षीरसागर, सांगोला पोलिस ठाण्याकडील मुळे, मड्डी यांनी या तपासकार्यात सहभाग घेतला.

प्रतीकचा पाय गायबच!
पूर्वी माचणूर गावात रेड्याचा बळी दिला जात होता. रेड्याचे पाय कापून तोंडात दिले जात होते. भारत शिवशरण हा गावातील मंदिरात पुजारी असून तो मांत्रिकाचे काम करतो. या प्रकरणात प्रतीकचा उजवा पाय का तुटला आणि तो कुठे आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

अपहरण केल्यानंतर नरबळीपूर्वी प्रतीकचा अत्यंत निर्घृणपणे छळ करण्यात आला. विधीसाठी रक्तही घेण्यात आले. याबाबत सुरवातीच्या टप्प्यात साशंकता होती. या गुन्ह्यात प्रत्यक्ष पाहणारे कोणीच नव्हते. भक्कम पुरावा हातात आल्यानंतर आम्ही या निष्कर्षावर पोचलो आहोत. हा संवेदनशील विषय आहे. आजारातून सुटका करून घेणे व धनलाभासाठी नानासाहेब डोके याने हा प्रकार घडवून आणला आहे. महाराष्ट्रातील अन्‍य नरबळींच्या गुन्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही या गुन्ह्याच्या निष्कर्षापर्यंत पोचलो आहोत. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

Web Title: Pratik Shivsharan Murder Crime Bharat Shivsharan