सांगलीतील शामरावनगरात स्थलांतराची तयारी...कशामुळे वाचा

SHAMRAONAGAR.jpg
SHAMRAONAGAR.jpg
Updated on

सांगली- बारमाही पाण्याने वेढलेल्या शामरावनगर परिसराला महापुराच्या भयाची टांगती तलवार कायम असते. कृष्णा नदीपासून काही अंतरावर असलेल्या या उपनगराचे पाणी निचरा होत नसल्याचे दुखणे जुनेच आहेत. गतवर्षी महापुराच्या दणक्‍याने उपनगराची दाणादाण झाली. त्यातून प्रशासन व कारभाऱ्यांनी शहाणपण घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेच चित्र आहे. यंदा देखील हवामान खात्याचा सरासरी पावसाचा अंदाज असल्याने उपनगरातील सुमारे 15 हजार नागरिकांना जीव टांगणीला लागला आहे. 


कोल्हापूर रोडशेजारी असणारे हे उपनगर मुळात बशीच्या आकाराचे असल्याने साठलेले पाणी बारमाही राहते. दलदल, चिखलामुळे पावसाळ्यात नरकयातना सोसण्याची वेळ नागरिकांवर येते. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही सक्षम व्यवस्था नाही. सांडपाणी ड्रेनेज व्यवस्था निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे लोटली. रडतखडत काम पूर्ण झाले. मात्र ती यंत्रणा तशीच पडून आहे. गटारी ओसंडून वाहतात. कचरा उठाव न झाल्याने भटकी जनावरे त्यावर गुजराण करण्यासाठी तळ ठोकून असतात. पाण्याची डबकी जागोजागी असल्याने पाणगवताचा पसारा वाढतोच आहे. त्यामुळे डासांसह साप, विंचू यासह धोकादायक प्राणी पाचवीला पुजले आहेत.

येथील समस्यांची तक्रार मध्यंतरी पंतप्रधान मोदींच्या पोर्टलवर गेली. त्यामुळे प्रशासन हलले. तातडीने उपाययोजना करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या. पण नंतर त्या थंडावल्यादेखील. भडंग कारखाना परिसर, ज्ञानेश्‍वर कॉलनी, सुंदर कॉलनी, विठ्ठल कॉलनी, विश्‍वविनायक चौक, वरद कॉलनी, महसूल कॉलनी परिसरात वर्षभर पाण्याचा मुक्‍काम असतो. गेल्या दोन वर्षांपासून आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नाने चिखलमय रस्त्यावर अगोदर मुरुमीकरण व नंतर डांबरीकरण झाले. गतवर्षी विविध कॉलन्या, गल्ली तसेच मुख्य रस्ता असे सुमारे 8 किमी डांबरीकरणही झाले. मोकळ्या सुमारे 350 प्लॉटवर झाडे झुडपांचे साम्राज्य असल्याने पाणी अडून राहते. त्याबाबत महापालिका कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. 


गतवर्षी पुराच्या विळख्यात अडकल्याने यंदा नागरिकांनी स्थलांतराची पूर्वतयारी सुरु केली आहे. गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणारे बहुतांश नागरिक या भागातील रहिवाशी असल्याने महापूर आल्यास स्थलांतर कोठे करावयाचे, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर मोठा आहे. गतवर्षी महापुराचा सामना करताना उडालेली त्रेधातिरपिट न परवडणारी आहे. त्यात यंदा कोरोनाचे वैश्‍विक संकट असल्याने नातेवाईक,मित्रमंडळी कितपत थारा देतील, हा देखील गहन प्रश्‍न आहे. 


रस्ता व नागरी सोयी सुविधांसाठी आगळीवेगळी डझनभर आंदोलने झाली. मुरमीकरण, खडीकरण तसेच डांबरीमुळे रस्त्याची वाढलेली उंची नागरिकांना गैरसोयीची आहे. बहुतांश घरे रस्त्याच्या उंचीपेक्षा किमान दीड दोन फूट खाली असल्याने पाणी थेट घरात घुसण्याची भिती आहे. तसेच साठलेले पाणी कायम राहत असल्याने वर्षभर उपद्रव होतो तो वेगळाच. नियोजनाच्या नावाने बट्ट्याबोळ असल्याने लेखी तसेच तोंडी तक्रारी करुनही त्याला केराची टोपली दाखवली जात असल्याचा विदारक अनुभव आहे. कोरोनानंतर महापुराचे संकट गडद होण्यापूर्वी प्रशासनाने नागरिकांचा विचार करुन पावले उचलण्याची गरज आहे. 
- संदीप दळवी, सामाजिक कार्यकर्ता, शामरावनगर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com