
सांगली : गडगडाटासह पावसाची हजेरी
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. उन्हाळी पिकांसाठी हा पाऊस पोषक असून द्राक्ष, ऊस व अन्य फळ पिकांनाही तो फायदेशीर आहे. उन्हाने लाहीलाही झालेली असताना दमदार पावसाने सगळीकडे वातावरण अल्हाददायक झाले.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी हवा आहे. यंदा मॉन्सून लवकर येणार, असा सांगावा आला आहे. त्यामुळे वातावरणात बदल दिसू लागला आहे. आजपासून दोन दिवस पावसाचा अंदाज होता. त्यानुसार सायंकाळी दमदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट झाला, वातावरण अंधारून आले होते. अर्धा तास दमदार पाऊस झाला.
त्यानंतरही काही वेळ रिपरिप सुरूच होती. उशिरापर्यंत विजा चमकत होत्या. शहराच्या सखल भागात नेहमीप्रमाणे तळी साचली. शंभर फुटी रस्ता, भरतनगर, रामनगर परिसरासह शामरावनगरमध्ये रिकामे प्लॉट पुन्हा भरले. भाजी मंडईत पाणी पाणी झाले. विक्रेत्यांची तारांबळ उडाली. तासभर वाहतूक संथ गतीने सुरू राहिली. हा पाऊस कार्यालये सुटण्याच्या वेळेस सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूससह ठिकठिकाणी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली.
Web Title: Presence Of Thundershowers In Sangli District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..