"शिवशाही ते पेशवाई'त खोट्या इतिहासाबद्दल संताप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सांगली - महान इतिहासकारांनी केलेल्या चुका काढण्याचे मोठे धाडस प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी "शिवशाही ते पेशवाई' या ग्रंथात दाखवले. खऱ्या इतिहासाला हात घालण्याची हिंमत दाखवली. संताप व्यक्त करतानाही त्यांनी संयम राखला असल्याचे प्रतिपादन जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व इतिहास संशोधक प्रा. डॉ. अशोक राणा यांनी केले. 

सांगली - महान इतिहासकारांनी केलेल्या चुका काढण्याचे मोठे धाडस प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी "शिवशाही ते पेशवाई' या ग्रंथात दाखवले. खऱ्या इतिहासाला हात घालण्याची हिंमत दाखवली. संताप व्यक्त करतानाही त्यांनी संयम राखला असल्याचे प्रतिपादन जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व इतिहास संशोधक प्रा. डॉ. अशोक राणा यांनी केले. 

"शिवशाही ते पेशवाई' या विषयावरील व्याख्यानमालेत प्राचार्य पी. बी. पाटील यांना मांडलेले विचार लिखित स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहेत. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज डेक्कन मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन हॉलमध्ये झाला. त्या वेळी डॉ. राणा बोलत होते. गुरुवर्य परशूरामजी नंदीहळ्ळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. राणा म्हणाले, ""शिवचरित्र खरे लिहिले जावे असे म्हटले जाते. मराठ्यांनी इतिहास घडवला. त्यांना लिहायला वेळ नव्हता, परंतु मराठा जेव्हा लिहायला लागले तेव्हा इतिहास कळायला लागला. बखर म्हणजेच खबर आहे. चमत्कारिकतेमुळे बखरीची विश्‍वासार्हता संपते. याच बखरीवर आधारित अनेकांनी खोटा इतिहास लिहिला. संभाजीराजांची प्रतिमा विकृत बनवली गेली. वा.सी. बेंद्रे यांनी 40 वर्षे संशोधन करून सत्य मांडले. संभाजीराजांची खरी प्रतिमा पुढे आणली.'' 

ते म्हणाले, ""खोटा इतिहास लिहिणाऱ्या अनेक महान व्यक्तींच्या चुका पी. बी. पाटील सरांनी काढल्या. त्यासाठी फार मोठे धाडस त्यांनी दाखवले. इतिहासकारांनी केलेल्या चुकांबद्दल पी. बी. सरांनी "शिवशाही ते पेशवाई' मध्ये संताप व्यक्त केला; पण संयम सोडला नाही. अनेक इतिहासकारांमध्ये हिंमत नसते ती त्यांनी दाखवली आहे.'' 

श्री. नंदीहळ्ळी म्हणाले, ""प्राचार्य पी. बी. पाटील यांच्यामध्ये खरा इतिहास निर्भीडपणे सांगण्याची दृष्टी होती. रवींद्रनाथ टागोरांप्रमाणे शांतिनिकेतनची स्थापना करून शिक्षणाचा प्रसार केला. कवी, लेखक, शाहीर, कादंबरीकार असलेले पी.बी. हे विचारवंत राजकारणीही होते.'' जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील यांनी स्वागत केले. श्रीमती गीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. किसन यल्लूरकर, दीपक दळवी, प्रा. एल. एस. पवार, बाळासाहेब पाटील, ना. ह. माळी, तारा भवाळकर, प्रा. रामचंद्र घोडके आदींची उपस्थिती होती. डॉ. शालिनीताई पाटील यांच्या शुभेच्छा पत्राचे वाचन अपर्णा खांडेकर यांनी केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले. 

Web Title: Principal P. B. Patil's book publishing