मोदी, शहांमुळेच दिल्लीत दंगल; पृथ्वीराज चव्हाणांचा घणघणात

मोदी, शहांमुळेच दिल्लीत दंगल; पृथ्वीराज चव्हाणांचा घणघणात

सातारा : दिल्ली जळत असताना मोदी ट्रम्पच्या स्वागतात व्यस्त होते. मुळात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ठराविक अधिकार आहेत. दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मात्र, तेथील सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले आहेत. मोदी, शहांच्या जोडगोळीमुळे दिल्लीत दंगली झाल्या आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कॉंग्रेस भवनात कार्यकर्ता मेळावा आणि नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या सत्कार कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, ""जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नव्हते. सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून डॉ. सुरेश जाधव यांना संपूर्ण जिल्हा ओळखतो. त्यामुळे त्यांच्या नावाला मी प्राधान्य दिले. जिल्हाध्यक्ष पद दिले, की सगळे प्रश्‍न मार्गी लागायला त्यांच्या हातात जादूची कांडी नसते. त्यांच्या मागे पाठबळ लागते. त्यांनी पक्ष बळकट करण्याचा विडा उचलला आहे. ज्या कॉंग्रेस पक्षाने देशात लोकशाही आणली, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच पक्षाचा विचार धोक्‍यात आला आहे. सध्या जातीयवादी पक्ष आपला खरा चेहरा दाखवत आहेत. दिल्लीत 42 जणांचे अमानुष खून झाले. दिल्ली जळत असताना मोदी ट्रम्पच्या स्वागतात व्यस्त होते. पोलिसांना त्यांचे कामच करून दिले नाही. त्यामुळे नाहक 42 जणांचा बळी गेला. 2002 ला गुजरातमध्ये जे घडले, तेच पुन्हा घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असून, धर्माधर्मात, जाती- जातीत तेढ निर्माण करण्याचा मोदी, शहा यांनी कट केला आहे.''
 
नागरिकत्व सुधारणा कायदा आम्हाला मान्य नाही. तो रद्द करावा, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, ""हा कायदाच मुळात दोषपूर्ण आहे. केंद्रात बहुमत आल्याने सर्व दुष्ट कायदे मागच्या दाराने भाजपचे नेते करत आहेत. हिंसक दंगली घडविण्याचे काम मोदींचे सरकारच करीत आहेत. जेएनयूमध्ये बुरखा घालून मुलांना चोपले गेले. या सर्व प्रकारांमुळे बाहेरच्या देशातील लोक आपल्या देशाची निंदा करत आहेत. महात्मा गांधींच्या देशाला काय झालंय असे विचारत आहेत. त्यामुळे देशात गांधींचा विचार कायम ठेवण्याचा विडा आपल्याला उचलायचा आहे.''
 
या वेळी कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, पृथ्वीराज पाटील (सांगली), महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, हिंदुराव पाटील, एनएसयुआयचे सरचिटणीस शिवराज मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 


...अन्‌ बैलही पळाला 

मेळाव्यात प्रताप देशमुख यांनी त्यांच्या भाषणात वाईच्या कार्यक्रमातील किस्सा सांगितला. ते म्हणाले, की डॉ. सुरेश जाधव यांच्या निवडीने तीन मेसेज कार्यकर्त्यांत जात आहेत. यामध्ये वाई येथील एका सभेत गाडगीळ यांनी भाषण केले. त्यातील एक मुद्दा सांगतो, महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक लोक थांबले होते. कारण काय तर बैल महामार्गावर बसला होता. कोणाकडून तो हटत नव्हता. शेवटी क्रेन आणून उठविण्याचे ठरते. तेवढ्या गर्दीतून वाट काढत कॉंग्रेसचा कार्यकर्ता तेथे येतो. पाच मिनिटे मागतो, तो बैलाच्या जवळ जातो, पाठ गोंजारत कानात काहीतरी पुटपुटतो. तोच बैल उठून पळतो. सगळे त्या कार्यकर्त्याला विचारतात काय सांगितले कानात. तेव्हा तो सांगतो, की कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष करतो असे म्हटले. म्हणजे जिल्हाध्यक्ष व्हायला बैलही तयार नाही, असे उदाहरण त्यांनी देताच उपस्थितात हशा पिकला.

वाचा ः लई भारी : साताऱ्यातील पोलिसांनी त्याच्या मुसक्‍याच आवळल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com