पर्यटनात खासगी क्षेत्रातील गुंतवणूक महत्त्वाची

अजित झळके 
Friday, 29 January 2021

पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी खासगी क्षेत्रातील गुंतवणूक महत्त्वाची आहे. व्हिजन सांगली फोरमने पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. त्याला चालना मिळेल, असे धोरण शासकीय पातळीवर राबवले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

सांगली : पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी खासगी क्षेत्रातील गुंतवणूक महत्त्वाची आहे. व्हिजन सांगली फोरमने पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. त्याला चालना मिळेल, असे धोरण शासकीय पातळीवर राबवले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

व्हिजन सांगली ऍट 75 फोरमने बनवलेल्या पर्यटन विकास आराखड्याचे प्रकाशन डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. फोरमचे मुख्य समन्वयक सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक अभिजित भोसले, माजी जि. प. सदस्य बाबासाहेब मुळीक, जिल्हा टूर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, अभियंता प्रमोद परीख, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष शरद शहा, चतुरंग जाहिरात संस्थेचे महेश कराडकर आदी उपस्थित होते. 

डॉ. चौधरी म्हणाले,""पर्यटन विकासाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा व या टप्प्यावर गरजेचा आहे. व्हिजन सांगली 75 फोरमने मांडलेला आराखडा सातत्य ठेवून जर राबवला तर येत्या आठ-दहा वर्षांत चांगले यश येईल. त्याला बळ देणारे धोरण शासकीय पातळीवर राबवू. गुंतवणूक मात्र खासगी क्षेत्रातूनच व्हावी लागेल. संपन्न शेती, चांदोलीचे जंगल, कृष्णा नदी, श्री गणपती मंदिर, मिरजेचा दर्गा ही खूप महत्त्वाची स्थळे आहेत. तेच बलस्थान आहे.'' 

सुरेश पाटील म्हणाले,""हे सर्वपक्षिय फोरम आहे. ते सातत्याने काम करून बदल घडवेल. सांगलीत काहीच नाही हे सांगत बसण्यापेक्षा ते घडवण्यासाठी आम्ही काम करू. पालकमंत्री जयंत पाटील त्याला बळ देतील, प्रशासनाने आम्हाला साथ द्यावी.'' प्रमोद परीख म्हणाले,""कोल्हापूरने पर्यटनात गती घेतली आणि सांगली मागे राहिली. त्यात ब्रॅंडिंग महत्त्वाचे ठरले. बाहेरचे लोक इथे आले पाहिजेत, जे येतात त्यांना नजरेसमोर ठेवून पर्यटन विकासाची मांडणी करूया.'' 

श्री. रोकडे म्हणाले,""महापालिकेने छोटे-छोटे प्रयोग हाती घेतले आहेत, जे सांगलीकरांना विरंगुळा देतील. आम्ही फोरमच्या धोरणासोबत काम करू.'' कोल्हापुरातील पर्यटन विकासाबाबत विनोद कांबोज, योगेश देशपांडे, हृषीकेश केसकर यांनी माहिती दिली. यावेळी राजगोंडा पाटील, बी. आर. पाटील आदी उपस्थित होते. 

"सकाळ'चा उल्लेख 
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी "सकाळ'ने वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या पर्यटन विशेषांकाचा या बैठकीत आवर्जून उल्लेख केला. त्या अंकाचे प्रकाशन करताना मांडलेल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private sector investment is important in tourism