कोरोनाबाधित शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ द्या : शिक्षक समिती

अजित झळके
Tuesday, 29 September 2020

कोरोनाबाधित शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ई-मेलव्दारे राज्य शासनाकडे केली. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी ही माहिती दिली. 

सांगली : कोरोनाबाधित शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ई-मेलव्दारे राज्य शासनाकडे केली. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ""राज्यातील शिक्षकांना कोरोना काळात विविध जबाबदारी आहे. त्यावेळी त्यांना संसर्ग होऊ लागला आहे. त्यावर उपचारासाठी त्यांना हजारो-लाखो रूपयांचा खर्च येतोय. वैद्यकिय प्रतिपूर्तीच्या शासन आदेशात हा आजार समाविष्ट नाही. त्यामुळे त्यांना कुठलीही प्रतिपूर्ती मिळत नाही.

शासनाने वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या शासन निर्णयात "कोविड-19'चा समावेश करावा. समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, सरचिटणीस विजय कबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना तशी मागणी केली आहे.' 

ते म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शिक्षकांवर अधिकाधिक जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. आरोग्य, पोलिस अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू आहे. ते शिक्षकांना नाही. शिक्षकांवरील हा अन्याय दूर करावा.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तत्काळ द्यावी. बाधित शिक्षकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी मदत व्हायला हवी. कोविडमुळे बाधित झालेल्यांना वैद्यकीय रजा मंजूर कराव्यात.' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide medical reimbursement benefits to corona positive teachers: Teachers Committee