इस्लामपुरात सार्वजनिक गणेशोत्सव रद्द 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

शहरात एकाही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही, असा सार्वत्रिक निर्णय आज येथे घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली

इस्लामपूर (सांगली)  : शहरात एकाही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही, असा सार्वत्रिक निर्णय आज येथे घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली


कृष्णात पिंगळे म्हणाले, "शहरात मार्चमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झालेला होता त्यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, नागरीक यांनी सामुहीक प्रयत्न करुन कोरोना प्रसारास आळा घालून कोरोनामुक्तीचा इस्लामपूर पॅटर्न असा आदर्श निर्माण केला होता; परंतु आता पुन्हा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत आगामी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा केलेस कोरोना संसर्गाचा धोका वाढणार आहे. वाळवा तालुक्‍यातील अनेक गावांनी तसेच आष्टा शहरातील मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा नाही अशी विधायक व पुरोगामी भुमिका घेवून आदर्श निर्माण केलेला आहे.

काही मंडळानी गणेशोत्सवचा वाचणारा खर्च साजरा न करता त्यातून होणा-या बचतीमधून कोव्हिड सेंटरला विविध साधने उपलब्ध करुन देण्याची भूमिका घेतलेली आहे. इस्लामपूर शहरानेही आज अखेर लोकहिताचेच निर्णय घेतलेले आहेत. इस्लामपूर शहरातही आगामी गणेशोत्सवही सार्वजनिकरित्या साजरा करु नये. कोणत्याही मंडळाने सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करु नये."

नारायण देशमुख म्हणाले, "इस्लामपूरलगतच्या ग्रामिण भागातील गावामध्ये सध्या आम्ही बैठका घेत आहोत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चालूवर्षी सावजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय तेथील ग्रामस्थ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे घेत आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सण, उत्सव घरीच साजरे करुन प्रशासनास सहकार्य करावे." बैठकीला उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक राजेंद्र डांगे, विश्वनाथ डांगे, शहाजी पाटील, संजय कोरे, संग्राम पाटील, वैभव पवार, शकील सय्यद, प्रदिप लोहार, अमित ओसवाल, अजित पाटील उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Ganeshotsav canceled in Islampur