सरकारविरोधात जनतेत प्रचंड रोष : धनंजय महाडिक ; भाजपचा पदवीधर मेळावा

बलराज पवार
Tuesday, 24 November 2020

वीज बिल माफी, कर्जमाफी, मराठा व धनगर आरक्षण या प्रश्‍नांवरून राज्यातील युवक, महिला, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, असे वक्तव्य माजी खासदार आणि भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी येथे केले.

सांगली : वीज बिल माफी, कर्जमाफी, मराठा व धनगर आरक्षण या प्रश्‍नांवरून राज्यातील युवक, महिला, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मराठा, धनगर समाजात असंतोष आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत स्वत:ला उमेदवार समजून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून काम करा आणि संग्रामसिंह देशमुख, जितेंद्र पवार यांना विजयी करा, असे आवाहन माजी खासदार आणि भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी येथे केले. 

सांगलीत खरे क्‍लब हाऊस येथे आज भाजपच्या वतीने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. पदवीधर मतदार संघातून सांगलीचे संग्राम देशमुख तर शिक्षक मतदार संघातून सोलापूरचे जितेंद्र पवार हे उमेदवार आहेत. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले,""संग्राम देशमुख जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने सांगलीकरांची जबाबदारी वाढली आहे. आम्ही पुण्यातून ताकद देतो.'' 

खासदार संजय पाटील म्हणाले,""चंद्रकांत पाटील यांनी सलग दोनवेळा या मतदार संघातून विजय मिळवला आहे. आता संग्राम देशमुख भाजपची हॅट्‌ट्रीक पूर्ण करतील.'' आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले,""ही निवडणूक अरुण लाड, जयंत पाटील यांच्या विरोधात नसून ती विश्‍वासघाताच्या विरोधातील आहे. देवेंद्र फडणवीसांकडे पाहून जनतेने मतदान दिले होते, मात्र विरोधकांनी विश्‍वासघात केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली.'' 

पृथ्वीराज देशमुख म्हणाले,""या मतदार संघात केलेल्या सर्व्हेत भाजप 70 टक्के पुढे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांमध्ये निर्माण केलेल्या विश्‍वासाचा हा परिणाम आहे.'' भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, तसेच माजी आमदार सर्वश्री दिनकर पाटील, विलासराव जगताप, भगवान साळुंखे, राजेंद्र देशमुख, नितीन शिंदे, शेखर चरेगावकर, बाबा देसाई, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, सुरेश आवटी, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, आरपीआयचे नेते विवेक कांबळे, महापालिकेचे नेते शेखर इनामदार आदी उपस्थित होते. 

लकी मतदार संघ 
धनंजय महाडिक म्हणाले,""पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा परंपरागत मतदार संघ आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे माजी मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघाचे दोन दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर त्यांना वर संधी मिळाली. अशा लकी मतदार संघातून संग्राम देशमुख उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्‍चित आहे.'' 

जयंत पाटील मतदार नाहीत! 
आमदार पडळकर म्हणाले,""या पदवीधर मतदार संघाची धुरा जयंत पाटील यांच्यावर आहे, त्यांचेच नाव पदवीधर मतदार यादीत नाही. यावरून त्यांची तयारी कशी आहे ते दिसून येते.'' 

मी कुठेही जाणार नाही! 
आमदार सुरेश खाडे यांनी खासदार संजय पाटील आपल्यासोबत आहेत हा दुग्धशर्करा योग असल्याचे म्हटले. यावर खासदार संजय पाटील यांनी, मी कुठे गेलो नाही आणि जाणार नाही, असे स्पष्ट करत आपल्याबद्दल चाललेल्या अपप्रचाराला प्रत्युत्तर दिले. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही, माझ्याबद्दलच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका. मी ज्या पक्षात जातो तेथे निष्ठेने काम करतो असे स्पष्ट केले.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public outrage against government: Dhananjay Mahadik; BJP's graduate's meet