संचारबंदीत सुरु आहे अशीही जनसेवा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या शहरात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्‍यक गोष्टी मिळत असल्या तरी काही भागातील वृध्द नागरिकांना तेथे जाण्यातही अडचणी आहेत. अशा नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत. 

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या शहरात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्‍यक गोष्टी मिळत असल्या तरी काही भागातील वृध्द नागरिकांना तेथे जाण्यातही अडचणी आहेत. अशा नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत. 

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आणि त्यांचे पती श्रीरंग केळकर सध्या अशा वृध्द गरजूंना मदत करत आहेत. विशेष करुन वृध्द नागरिकांना संचारबंदीच्या काळात बाहेर पडणे अवघड होते. तसेच त्यांच्यापर्यंत सुविधाही पोहोचत नाहीत, अशा व्यक्तींना ते मदत करत आहेत. सध्या पाचजणांना ते नाश्‍ता, जेवण पुरवण्याचे काम चेतना पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांमार्फत करत आहेत. तर तीन व्यक्तींना घरी वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यात मदत करत आहेत. श्रीरंग केळकर म्हणाले, पुण्यात नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने राहणाऱ्या तरुणांचे माता, पिता सांगलीत राहतात.

अशांना या संकटाच्या काळात मदतीची गरज आहे. सध्या पाचजणांना आम्ही नाश्‍ता, जेवण, पाणी पुरवण्याचे कार्य करतो. तर तीन व्यक्तींना घरीच वैद्यकीय सुविधा देण्याचे काम केले आहे. त्यांच्यासाठी डॉक्‍टरची सोय केली आहे. या काळात वृध्दांना अशी मदत करण्याची गरज असते. त्यांना घराबाहेर जाता येत नसल्याने आम्ही या सोयी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा आणखी काहीजणांना आम्ही सुविधा उपलब्ध करुन देऊ शकतो. 

प्रभाग 18चे नगरसेवक अभिजित भोसले यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी किराणा, दुध, भाजीपाला, वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांचे गट केले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू उपलब्ध करुन देतात. नागरिकांकडून विचारणा झाल्यास त्यांना जवळच्या दुकान, दवाखाना, मेडिकल, दुध, भाजीपाला विक्रेता यांची माहिती दिली जाते. गरज पडल्यास वृध्द नागरिकांना सेवा दिली जाते. 

श्री. भोसले म्हणाले, नागरिकांना मदत करण्यासाठी ऑनलाईन ऍप सुरु करत असून यावर प्रभागातील दुकानदार, भाजीविक्रेते, मेडिकल, गिरणी यांची यादी उपलब्ध करुन देणार आहे. त्यावर नागरिकांनी आपली ऑर्डर नोंदवल्यास त्यांना घरपोच सेवा मिळेल असा प्रयत्न आहे. 
शहरातील विविध भागात असे सामाजिक कार्यकर्ते आपल्यापरीने संचारबंदीच्या काळात गरजूंना मदत करत आहे. यापुढेही ही गरज वाढत जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजातील वृध्द गरजूंना मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public service is also Communication block