
महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये दुही निर्माण करू नका बेळगाव महापालिका आणि आमदारपदी मराठी भाषिकच निवडून आला पाहिजे. यापुढे प्रश्न सुटावा यासाठी कालबद्द कार्यक्रम हाती घेण्यात येईल असे मत व्यक्त केले
बेळगाव : कर्नाटक सरकार उर्मटपणाने वागत असून यापुढे सीमाप्रश्नी जिंकण्याच्या दृष्टीने पावले पडली पाहिजेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे
मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर दीपक पवार लिखित संघर्ष आणि संकल्प कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे, माजी कृषी मंत्री शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सीमाप्रश्नाचे समनवयक मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आदींच्या उपस्थितत पार पडले.
यावेळी ठाकरे म्हणाले , सीमाप्रश्नी शिवसेना प्रमुखांना 3 महिने कारावास भोगावा लागला होता. त्यावेळी मुंबई धगधगत होती तीच धग पुन्हा एकदा सीमाप्रश्नी निर्माण करावी लागणार असून सीमाप्रश्नी सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत. कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय गप्प राहून चालणार नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना देखील बेळगावचे नामांतर करण्यात आले तसेच विधान सौध बांधण्यात आली हा न्यायालयाचा अपमान असून मराठी भाषिकांना महाराष्ट्र राज्यात आणल्याशिवाय गप्प बसून चालणार नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये दुही निर्माण करू नका बेळगाव महापालिका आणि आमदारपदी मराठी भाषिकच निवडून आला पाहिजे. यापुढे प्रश्न सुटावा यासाठी कालबद्द कार्यक्रम हाती घेण्यात येईल असे मत व्यक्त केले.
माजी मंत्री शरद पवार म्हणाले, सीमा लढ्याला ऐतीहासिक पार्श्वभूमी असून अनेक वर्षे येथील सामान्य जनतेने लढा सुरू ठेवला आहे महाजन अहवाल कशा प्रकारे चुकीचा आहे याबाबत माजी मुख्यमंत्री बी आर अंतुले यांनी पुस्तक लिहून सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली त्याच प्रमाणे या पुस्तकातून सर्वाना सीमालढ्याचा इतिहास समजेल कोल्हापूर व परिसरातील जनतेने नेहमीच सीमावाशीयांना पाठींबा दिला असून प्रश्न आता अंतिम पर्वात आहे त्यामुळे शेवटचे हत्यार म्हणून न्यायालयीन लढा पूर्ण तयारीने लढला जाईल असे मत व्यक्त केले
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती व विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे