पुणे-बंगळूर महामार्ग अत्यावश्यक वस्तूंसाठी सुरु; अद्याप दीडफूट पाणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी वाहने वगळता अवजड वाहतूक सोमवारी दिवशीही ठप्पच होती. महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय सर्व वाहनांची वाहतूक पूर्णपणे सुरू होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर : महापुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा महामार्ग आज (सोमवारी) सकाळी तातडीच्या वस्तू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलिंडर, औषधे तसेच भाजीपाल्यासाठी वाहतूक सुरू करण्यात आले आहे.

महामार्गावरील पाण्याची पातळी झपाट्याने ओसरू लागली आहे. आज सकाळी आठ वाजता पाण्याची पातळी दोन फुटावर होती. पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, आमदार अमोल महाडिक, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण भोसले आदींनी महामार्गावर रस्त्याची सकाळी पाहणी केली. त्यानंतर इमर्जन्सी सेवेसाठी वाहतूक सुरू करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून महामार्ग वाहतुकीला बंद करण्यात आल्याने हजारो वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून आहेत. पाण्याची पातळी दुपारपर्यंत आणखी ओसरेल. त्यानंतर रस्त्यात अडकलेल्या वाहनांबाबत निर्णय होईल, असेही पोलिस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी वाहने वगळता अवजड वाहतूक सोमवारी दिवशीही ठप्पच होती. महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय सर्व वाहनांची वाहतूक पूर्णपणे सुरू होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संततधार पाऊस व धरणांतील पाणी विसर्गामुळे ठिकठिकाणी उद्‌भवलेल्या पूरस्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक मंगळवारपासून ठप्प झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Banglore highway start for emergency services