बनावट तेल विकले अन... 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

संख (ता. जत) येथील भाग्यश्री किराणा स्टोअरमध्ये शेंगदाणा तेल म्हणून पामोलीन तेल विक्री केल्याप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने एक लाखाचा दंड सुनावला.

सांगली : संख (ता. जत) येथील भाग्यश्री किराणा स्टोअरमध्ये शेंगदाणा तेल म्हणून पामोलीन तेल विक्री केल्याप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने एक लाखाचा दंड सुनावला. अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वच्छतेचा अभाव व त्रुटीबद्दल आठ दुकानांना एक लाख 21 हजाराचा दंड सुनावला.

अधिक माहिती अशी, की अन्न व औषध प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे मारले. त्यात संख (ता. जत) येथील मेसर्स भाग्यश्री किराणा स्टोअर्शवर छापा टाकला होता. दुकानातून रिफाईन्ड व्हेजिटेबल ऑईल (पामोलीन तेल) चे नमुने घेतले होते. त्यात पामोलिन कमी दर्जाचे व लेबल दोषयुक्त असल्याचे आढळले. दुकानात ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी 60 हजार रूपये दंड केला. दुकानात लेबलवर शेंगदाण्याचे चित्र छापून आत पामोलीन तेलाची विक्री केली जात

असल्याबद्दल पेढीविरूद्ध न्याय निर्णय अधिकारी (पुणे) यांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यामध्ये सुनावणी होऊन न्याय निर्णय अधिकाऱ्यांनी पेढीला एक लाखाचा दंड केला. 

अन्य छाप्यातील तपासणीत सात प्रकरणात स्वच्छतेचा अभाव आढळला. लेबलवरील माहितीत त्रुटी आढळली. अनेक त्रुटी आढळल्यामुळे प्रकरणे दाखल करण्यात आली. नुकतेच या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानुसार शेतकरी फ्रूट भाजी ऍन्ड ज्यूस सेंटर तांदुळवाडी (ता.वाळवा), शेगाव (ता. जत) येथील धनराज दूध संकलन केंद्राचे वाहन (एमएच 10 एएल 1882), हॉटेल अरिहंत (सुभाषनगर), सोनम मसाले ऍन्ड ड्रायफ्रुट सेंटर (विटा), हॉटेल सुयोग (अंकली), मोरया रसवंतीगृह, राजस्थान स्वीट गुजराती हायस्कुलजवळ यांना 61 हजार रूपये दंड सुनावला. 

अन्न व औषध प्रशासनने सहआयुक्त सुरेश देशमुख, सांगलीचे सहाय्यक आयुक्त एस. ए. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, आर. एल. महाजन, श्रीमती पी. पी. फावडे, श्रीमती एम. एस. पवार, एस. एस. हाके, एस. ए. केदार यांनी कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune court fined Rs 1 lakh for selling palm oil as peanut oil