esakal | पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघ : पक्ष-संघटनांसमोर अपक्ष-बंडखोरांचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Region Teachers Constituency: Challenges of Independent Insurgents in Front of Party Organizations

 पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात प्रस्थापित पक्षसंघटनांसमोर बंडखोरांचे आव्हान असेल. येत्या एक डिसेंबरला निवडणूक आहे,

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघ : पक्ष-संघटनांसमोर अपक्ष-बंडखोरांचे आव्हान

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात प्रस्थापित पक्षसंघटनांसमोर बंडखोरांचे आव्हान असेल. येत्या एक डिसेंबरला निवडणूक आहे, मात्र अजूनही मतदारसंघातील मातब्बर शिक्षण संस्था व नेते मंडळींच्या भूमिका स्पष्ट नाहीत. अर्ज माघारीची मुदत संपली, तरी अजूनही पडद्याआड माघार, पाठिंब्याच्या हालचाली सुरू आहेत. 

विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांचे पुन्हा एकदा सर्वच पक्ष-संघटनासमोर आव्हान असेल. विनाअनुदानित शिक्षक संघटना हेच त्यांचे यावेळीही बलस्थानच असेल. युती शासन काळात ते एकला चलोरे भूमिका घेणाऱ्या आमदार सावंत यांनी राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादीशी घरोबा वाढला होता. त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जागा मिळावी असे प्रयत्नही केले होते. सावंत आता अपक्ष असले तरी ते "मला साहेबांचा आशीर्वाद आहे' असे सांगतात. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही जागा आग्रहाने आपल्याकडे कायम ठेवताना जयंत आसगावकर यांना महाआघाडीची उमेदवारी देऊन ही जागा जिंकण्याचा विडाच उचलला आहे. 

संघ परिवारातील शिक्षक परिषदेने आधीच सहा महिने सोलापूरचे जितेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने त्यांची तयारी आहे. सावंत आणि पवार यांची होमग्राऊंड सोलापूरमध्ये मतदार खेचाखेची असेल. गतवेळी सावंतासोबत असलेले सोलापूरचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील आता भाजपावासी आहेत त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष असेल. 
पुरोगामी समाजवादी परिवारातील एकेकाळची ताकदीची संघटना असा लौकिक असलेल्या शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे (टीडीएफ) यावेळी पुण्याचे जी. के. थोरात लढत आहेत. त्यांनी आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. टीडीएफच्या सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. थोरात हे राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीच्या गोतावळ्यातील उमेदवार मानले जातात. 

पुणे विभागात भक्कम संस्थात्मक जाळे असलेल्या विवेकानंद, रयत आणि भारती या दोन शिक्षण संस्था आहेत. यावेळी शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या पत्नी रेखा यांनी आपली उमेदवारी विवेकानंदची असल्याचा दावा करीत प्रचार सुरू केला आहे; तर याच संस्थेतील प्रा. राजेंद्र कुंभारही रिंगणात आहेत. रयत शिक्षण संस्थेची अधिकृत अशी भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे नेते दादासाहेब लाड यांनी कॉंग्रेससाठी माघार घेतली आहे. जैन पदवीधर संघटना ही या मतदारसंघातील आणखी एक प्रभावशाली संघटना आहे. जी. के. ऐनापुरे, प्रा. शरद पाटील यांच्या तत्कालीन विजयात या संघटनेच्या शिस्तबद्ध कामाचा वाटा होता. आता पुन्हा एकदा प्रा. पाटील पदवीधरच्या रिंगणात आहेत. त्यांची शिक्षकमध्ये कोणासोबत युती याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 

कॉंग्रेसचे तिकीट नाकारलेल्या महाराष्ट्र प्रदेश शिक्षक कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सुजाता माळी यांनी त्यांची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. शिक्षक मतदारसंघात पस्तीस उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघाचा पसारा मोठा आहे. त्यामुळे निरंतर संघटन काम आणि पक्षीय ताकदीच्या बळावरच मतदारांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसांत उमेदवारांना जीवाचे रान करावे लागेल. शिक्षक मतदारांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका आहे. 

जिल्हानिहाय मतदार 

जिल्हा शिक्षक मतदार केंद्र संख्या 
कोल्हापूर 11,998 76 
पुणे 30,002 125 
सांगली 6,732 48 
सातारा 7,426 74
सोलापूर 12,379 76 
एकूण 68537 367 

संपादन : युवराज यादव

loading image