esakal | पंक्‍चरवाला ते आमदार... मधुकर कांबळे यांचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

kamble

जत शहरात सायकलचे पंक्‍चर काढणाऱ्या मधुकर कांबळे यांचे नशीब जोरावर होते. ते पंचायत समिती सदस्य झाले आणि पुढे कॉंग्रेसच्या अत्यंत तगड्या उमाजीराव सनमडीकर या आमदारांचा पराभव करून अपक्ष आमदार झाले

पंक्‍चरवाला ते आमदार... मधुकर कांबळे यांचे निधन 

sakal_logo
By
बादल सर्जे

जत : जत शहरात सायकलचे पंक्‍चर काढणाऱ्या मधुकर कांबळे यांचे नशीब जोरावर होते. ते पंचायत समिती सदस्य झाले आणि पुढे कॉंग्रेसच्या अत्यंत तगड्या उमाजीराव सनमडीकर या आमदारांचा पराभव करून अपक्ष आमदार झाले. युती शासनाच्या काळात जतकरांनी हा चमत्कार करून दाखवला. पंक्‍चरवाला ते आमदार हा कांबळे यांचा प्रवास राहिला. त्यांचे आज सकाळी खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. माजी आमदार असूनही शेवटच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागला. 


मधुकर कांबळे मूळचे शेगावचे. त्यांचे जतमध्ये सायकल पंक्‍चर काढण्याचे दुकान होते. त्यावेळी जतमध्ये विलासराव जगताप या तरुण नेत्याने आपला गट बांधायला सुरवात केली होती. त्यांनी मधुकर कांबळे यांना पंचायत समितीला उभे केले. मधुकर यांच्या ध्यानीमनी नसताना ते पंचायत समितीला निवडून आले. पुढे राखीव मतदार संघ असलेल्या जतमध्ये कॉंग्रेसच्या सनमडीकर यांना रोखायचे कसे, यावर विरोधकांनी मोट बांधायला सुरवात केली. अवघ्या 29 वर्षे वय असलेल्या मधुकर कांबळे यांना बाशिंग बाधून मैदानात उभे केले. विलासराव जगताप, बसवराव पाटील, मोर्डी यांनी मैदानात उतरून धुरळा उडवला. "जुना बैल म्हातारा झालाय, नवं खोंड जोरात हाय', अशी प्रचाराची हलगी तापवली.

त्यामुळे मधुकर कांबळे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी राहिली आणि ते आमदार झाले. युती शासनाला त्यांनी पाठींबा दिला. त्यावेळी जिल्ह्यातून पाच अपक्ष आमदार विजयी झाले होते. त्या साऱ्यांनी दुष्काळी तालुक्‍यातील पाण्याच्या प्रश्‍नावर आवाज उठवला. तालुक्‍यातील सिंचन व्यवस्था मजबूत बनवणे, संख मध्यम प्रकल्पासह 7 मोठ्या तलावांची निर्मिती करणे, आदी महत्वाच्या कामावर त्यांनी लक्ष दिले. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर ते सामान्य जीवन जगत होते. कर्नाटकातील अथणी तालुक्‍यात ते सध्या मुक्कामी होते.