esakal | कृष्णेच्या काठावर सात फुटी मगरीचा वावर; नागरिकांत भीती

बोलून बातमी शोधा

null
कृष्णेच्या काठावर सात फुटी मगरीचा वावर; नागरिकांत भीती
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांजरी (निपाणी) : गतवर्षीच्या महापुरातून कृष्णा नदी पात्रात आलेल्या तब्बल सात फुटी मगरीचे दर्शन गेल्या काही दिवसांपासून होऊ लागले आहे. त्यामुळे मांजरी, चंदूर, इंगळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मगरीचा बंदोबस्त करावा, आशी मागणी होत आहे.

काल (२६) सकाळी इंगळी येथील महावीर कोळी हे आपली विद्युत मोटार सुरू करण्यासाठी नदी काठावर गेले होते. त्यांच्या विद्युत मोटारीजवळ ही मगर नदी पात्राबाहेर येऊन उन्हाच्या किरणांसाठी येऊन पडलेली दिसली. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये मगरीचा व्हिडीओ शुट करुन सोशल मीडियावर अपलोड केला. त्यामुळे मगरीची माहिती कृष्णा नदी काठावरील नागरिकांना मिळाल्याने ते सतर्क झाले आहेत.

हेही वाचा: बेळगावात राणी चन्नमा विद्यापीठाचा सावळा गोंधळ; विद्यार्थ्यांत नाराजी

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करुन मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण नदीत आंघोळीला, पोहण्यासाठी येतात. लहान मुलांना पोहोण्याच्या सरावासाठी नेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत कुणालाही मगरीकडून दुखापत झाल्याचा प्रकार घडलेला नाही. मात्र मगरीचा वावर असलेला भाग नागरी वस्तीपासून जवळच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी मगर नागरी वस्तीकडे आली तर काय करायचे अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वारंवार ही मगर मांजरी, चंदूर, इंगळी येथील ठराविक ठिकाणी नदीच्या पात्राच्या दिसत आहे. त्यामुळे कृष्णा काठावरील वस्तीवर भीतीचे वातावरण आहे.