बेळगावात राणी चन्नमा विद्यापीठाचा सावळा गोंधळ; विद्यार्थ्यांत नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावात राणी चन्नमा विद्यापीठाचा सावळा गोंधळ; विद्यार्थ्यांत नाराजी

बेळगावात राणी चन्नमा विद्यापीठाचा सावळा गोंधळ; विद्यार्थ्यांत नाराजी

बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठ (आरसीयु) अंतर्गत येणाऱ्या पदव्यूत्तरच्या पहिल्या व तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षा लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा होण्याआधीच विद्यापीठाने दुसऱ्या व चौथ्या सेमीस्टरच्या ऑनलाईन वर्गांना बुधवारपासून (२८) सुरुवात केली जाणार असल्याचा आदेश काढला आहे. विद्यापीठाच्या या आदेशामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यापीठाचा सावळा गोंधळ चव्हाट्यासमोर आला आहे. विद्यापीठाने पहिल्या आणि तिसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षा झाल्यानंतर किंवा रद्द झाल्यानंतरच पुढील सेमीस्टरला सुरुवात करावी अशी मागणी होत आहे.

यंदा पदव्यूत्तरच्या परीक्षा एप्रिलच्या ५ तारखेपसून होणार होत्या. परिवहनचा संप आल्यामुळे सदरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्या परीक्षांचे २७ पासून नियोजन होते. मात्र, पुन्हा राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने त्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा रद्दचा आदेश सोमवारी (२६) दुपारी काढण्यात आला. परीक्षा रद्द होताच पुढील सेमीस्टरच्या वर्गांना सुरुवात होईल असा आदेश काढण्यात आला. बुधवारपासून हे वर्ग सुरु होणार आहेत. यामुळे प्राध्यापकही कामाला लागले आहेत.

हेही वाचा: सहकारी गृहनिर्माण संस्था सहकारातून वगळण्याच्या हालचाली; समितीची स्थापना

विद्यापीठाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या पहिल्या व तिसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षा अनियमित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार २८ एप्रिलपासून प्राध्यापकांना विद्यापीठातून व महाविद्यालयातूनच पदव्यूत्तर अभ्यासक्रम २ व ४ चे वर्ग आणि हजेरी ऑनलाईन घेणे बंधनकारक आहे. सर्व प्राध्यापकांनी ऑनलाईन वर्ग घेतलेल्याचा अहवाल विभागाचे प्रमुख तसेच प्राचार्यां मार्फत विद्यापीठाच्या कुलसचिव यांच्याकडे पाठवून द्यावेत. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास संबंधीत विभाग प्रमुखांनी व प्राचार्यांनी ती समस्या स्वतः सोडवावी. ऑनलाईन वर्ग परिणामकारक रित्या चालविण्याबाबत आवश्‍यक ती पुर्वतयारी करावी. अशी सुचना कुलसचिवांनी पदव्यूत्तर विभागाच्या प्रमुखांना व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना केली आहे.

विद्यार्थ्यांतून नाराजी

विद्यापीठाने पुढील सेमीस्टरचे वर्ग ऑनलाईन घेण्याच्या सुचना केल्यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त आहे. पदव्यूत्तरचे विद्यार्थी परीक्षा असल्याने अभ्यासात मग्न होते. मात्र, पुढील सेमीस्टर सुरु होणार असल्याने विद्यार्थी पुढील सेमीस्टरवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. पुढील पंधरा दिवसांच्या कालावधीत विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा मागील सेमीस्टरचा अभ्यास करावा लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सेमीस्टरच्या गुणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यापीठाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Rani Channamma University Decision Of Next Semester Online Classes In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top