अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेच! युवासेनेची विद्यापीठात धाव अन्‌ पदाधिकाऱ्यांनी दिला 'हा' इशारा

तात्या लांडगे
Wednesday, 15 July 2020

कुलगुरुंनी सोडावी दुहेरी भूमिका 
राज्य सरकारने प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत नियुक्‍त केलेल्या राज्यस्तरीय समितीने यापूर्वीच सरकारला अहवाल दिला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्वच विद्यापीठांनी परीक्षेबाबत चिंता व्यक्‍त केली होती. त्यानंतर राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या. तरीही विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परिस्थितीचा अंदाज न घेताच परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. अशा परिस्थितीत कुलगुरूंनी दुहेरी भूमिका सोडून सोलापूर शहर-जिल्ह्यातील परिस्थिती आणि विद्यार्थ्यांनी संमतीपत्राद्वारे नोंदविलेला कल, यानुसार विद्यापीठने परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करावा. 
- विठ्ठल वानकर, शहरप्रमुख, युवासेना, सोलापूर 

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून मृत्यूदरात सोलापूर राज्यात अव्वल आहे. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेऊनही विद्यापीठाने अंतिम वर्षातील परीक्षेबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधील संभ्रम वाढला आहे. त्यातून काही अनुचित प्रकार घडल्यास विद्यापीठ प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा युवासेनेने दिला आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने पूर्वी संबंधित जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहून परीक्षेबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते. राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परीक्षा होतील असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या पारंपारिक अभ्यासक्रमाच्या 20 हजार विद्यार्थ्यांपैकी नऊ हजार विद्यार्थ्यांनी काहीच पर्याय निवडलेला नाही. तर दुसरीकडे साडेअकरा हजार विद्यार्थ्यांपैकी 89 टक्‍के विद्यार्थ्यांनी परीक्षा नकोच हा पर्याय निवडला आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने परीक्षेबाबत तत्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा, असे निवेदन युवासेनेच्या वतीने विद्यापीठाला देण्यात आले आहे. यावेळी युवासेनेचे शहरप्रमुख मनिष काळजे, जिल्हाप्रमुख महेश देशमुख, स्वप्नील वाघमारे, उपजिल्हाप्रमुख लखन शिंदे, शुभम घोलप, प्रसाद नीळ, काशी विभुते आदी उपस्थित होते. 

कुलगुरुंनी सोडावी दुहेरी भूमिका 
राज्य सरकारने प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत नियुक्‍त केलेल्या राज्यस्तरीय समितीने यापूर्वीच सरकारला अहवाल दिला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्वच विद्यापीठांनी परीक्षेबाबत चिंता व्यक्‍त केली होती. त्यानंतर राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या. तरीही विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परिस्थितीचा अंदाज न घेताच परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. अशा परिस्थितीत कुलगुरूंनी दुहेरी भूमिका सोडून सोलापूर शहर-जिल्ह्यातील परिस्थिती आणि विद्यार्थ्यांनी संमतीपत्राद्वारे नोंदविलेला कल, यानुसार विद्यापीठने परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करावा. 
- विठ्ठल वानकर, शहरप्रमुख, युवासेना, सोलापूर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question of final year exam; runs in Yuvasena University