‘राधानगरी’चे चार दरवाजे पुन्हा उघडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची संततधार होती. आजअखेर १६ हजार ७०७ मिलीमीटर इतका पाऊस झाला. करवीर तालुक्‍यात साडेसातशे मिलीमीटर इतका पाऊस झाला असून, पिके खराब झाली आहेत. शहरात आज पावसाची रिपरिप होती. 

कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची संततधार होती. आजअखेर १६ हजार ७०७ मिलीमीटर इतका पाऊस झाला. करवीर तालुक्‍यात साडेसातशे मिलीमीटर इतका पाऊस झाला असून, पिके खराब झाली आहेत. शहरात आज पावसाची रिपरिप होती. 

राधानगरी - राधानगरी पाणलोट क्षेत्रातील दाजीपुरात २४ तासांत ६८ मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज पहाटे खुले झाले. यातून ५७१२ व वीज निर्मितीसाठी १६००, असा ७३१२ क्‍युसेक पाण्याचा भोगावती नदीत विसर्ग सुरू आहे. यामुळे भोगावती नदीला पूर आला आहे. तारळे आणि शिरगाव बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणलोट क्षेत्रातून पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने हा विसर्ग सुरूच राहण्याची शक्‍यता आहे. पावसाने हजेरी कायम ठेवल्याने धरण पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक मर्यादित ठेवण्यासाठी सर्वच धरणांतून विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी या धरणातून चार हजार क्‍युसेक विसर्ग सुरू आहे.

कोवाड परिसरात रिपरिप
कोवाड - आज कोवाड परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण व हवेत गारठा जाणवत होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने ताम्रपर्णी नदीच्या पाण्यात वाढ झाली. असाच पाऊस सुरू राहिला तर शेतीचे प्रचंड नुकसान होणार असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. अडीच महिन्यांपासून या भागात पावसाची संततधार असल्याने शेतातून पाणी तुंबले आहे. यामुळे भात व ऊस पिकाला याचा फटका बसला आहे.

भेडसगाव परिसरात रिपरिप
भेडसगाव : दोन-तीन दिवस उघडझाप असलेल्या पावसाची रविवारी रात्रीपासून पुन्हा रिपरिप सुरू झाली. तीन महिन्यांपासून भेडसगाव, वारणा कापशी परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेले दोन दिवस पाऊस कमी प्रमाणात होता. ऊन, पाऊस असा खेळ सुरू होता. त्यामुळे शेतकरीही सुखावले होते. परंतु, काल रात्रीपासून पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे.

आजअखेर पाऊस -
एकूण पाऊस मि.मी.- हातकणंगले २.८८ (४०६.७७), शिरोळ २.४३ (२५७.४९), पन्हाळा १२.८६ (१०४७.२०), शाहूवाडी १४.१७ (२२६६.६०), राधानगरी १५.५० (१९८१.८७), गगनबावडा २७.५० (३६४०.५०), करवीर ४.२७ (७६४.२५), कागल ७.२९ (९७०.१२), गडहिंग्लज ४.०० (६०८.२९), भुदरगड ११.८० (१५८९.२०), आजरा १५.२३ (१५९३.७३), चंदगड १८.६७ (१९५१.३९). एकूण १३६.६२ (१७०७७.४३), सरासरी ११.३९ (१४२३.१२).

गगनबावड्यात जोर वाढला
गगनबावडा - दोन दिवस उघडझाप करणाऱ्या पावसाने तालुक्‍यात आज पुन्हा संततधार सुरुवात केली. काल रात्रीपासूनच येथे संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्यामुळे सुखावलेला शेतकरीवर्ग पुन्हा चिंताग्रस्त बनला आहे. तालुक्‍यात दोन दिवस पाऊस कमी होता. अल्पकाळ सूर्यदर्शन सुध्दा झाले. ऊस पीक पूर्णपणे हातचे गेले असताना किमान भात पीक तरी हाती येईल, ही आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhanagari Dam Water Rain