Ghotavade accident : जगण्यासाठीची धडपड अन्‌ जीवघेणा प्रवास 

Ghotavade accident : जगण्यासाठीची धडपड अन्‌ जीवघेणा प्रवास 

कोल्हापूर - घरची परिस्थिती सामान्य, शेतीतून मिळणारे उत्पन्नही जेमतेम, त्यामुळे दीड-दोन तास प्रवास करून एमआयडीसीत नोकरीला जायचे. नाईलाजाने रोज जीव धोक्‍यात घालून प्रवासाची कसरत करायची. अंगमेहनत करून घाम गाळायचा. एवढे करूनही महिनाभर काम केल्यानंतर सर्व खर्च जाऊन हाती उरतात अवघे दोन ते पाच हजार रुपयेच. राधानगरी तालुक्‍यातील अनेक तरुणांची ही रोजची धडपड आहे. आज गोकुळ शिरगाव एमआयडीसीत येण्यासाठी निघालेल्या अशाच तरुण कामगारांच्या गाडीला अपघात होऊन चौघांना जीव गमवावा लागल्यानंतर अशी कसरत करणाऱ्या या भागातील शेकडो तरुणांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. 

राधानगरी तालुका हा तसा भौगोलिकदृष्ट्या संपन्न. पाणीही मुबलक; मात्र तालुक्‍यातील अनेक गावांत क्षेत्र कमी. परिणामी, अनेकांच्या वाट्याला सरासरी दोन ते तीन एकर जमीनच. काहींच्या नशिबी तर ते ही नाही. हीच अवस्था कागल तालुक्‍यातील काही गावांची. या भागातील सर्वसामान्य कुटुंबांना शेतीचा आधार आहे. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न जेमतेम. या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा ओढताना कसरत होते. अशा परिस्थितीत कुटुंबाला हातभार लावावा म्हणून तरुण कामासाठी बाहेर पडतात. त्यामुळे या भागातील शेकडो तरुणांना कागल, गोकुळ शिरगाव आणि शिरोली औद्योगिक वसाहती आशेचा किरण आहेत.

राधानगरी आणि कागल तालुक्‍यातील दुर्गम गावापासून 50 ते 100 किलोमीटर या वसाहती आहेत. तरीही येथील तरुण परिस्थितीमुळे एमआयडीसीत नोकरीला येतात. शेकडो तरुण दीड ते दोन तास प्रवास करून नोकरीच्या शोधात येतात. कोणी पार्टनरशिपमध्ये दुचाकीवरून, तर कोणी सामुदायिकपणे गाडी ठरवून हा प्रवास करतात. राहायचे म्हटले तर दोन ते चार हजार रुपये भाडे द्यावे लागते. शिवाय गावाकडील संपर्कही तुटत असल्याने बहुतांशी तरुण क्रूझर, जीप अशा मोठ्या गाड्यांसाठी महिन्याला दोन ते तीन हजार रुपये भाडे देऊन प्रवासातील त्रास व खर्च वाचवण्याचा प्रयत्न करतात. आज अशा 15 ते 20 गाड्या गोकुळ शिरगाव आणि कागल एमआयडीसीत कामगार घेऊन येतात. दुधाची वाहतूक करणाऱ्या टेंपोतून लोंबकळत येणाऱ्या तरुणांची संख्या वेगळीच आहे. 

यातील बहुतांश कामगार तिशीच्या आतले आहेत. कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, हा हेतू तर त्यांचा असतोच; शिवाय नोकरी असल्याशिवाय लग्नही होत नसल्याने अनेक तरुण सात ते आठ हजारांच्या पगारासाठी हा जीवघेणा प्रवासाचा धोका पत्करतात. दिवसभर अंगमेहनत करायची, जाता-येता दोन ते तीन तास प्रवास करायचा. 

भाड्याने घेतलेल्या गाड्यांची अवस्था फारशी बरी नाही. त्यातच कामावर वेळेत जाण्यासाठी गाड्यांचा वेग आपसूकच वाढतो. यातून भीषण अपघात होतात आणि कुटुंबाचा आर्थिक आधार बनू पाहणाऱ्या तरुणांचा हकनाक बळी जातो. आज घोटवडे येथील अपघाताने चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी दुचाकीच्या अपघातात अशाप्रकारे आजपर्यंत 20 ते 30 जणांनी जीव गमावला आहे. तर तितकेच विकलांग बनले आहेत. आजच्या या भीषण दुर्घटनेनंतर शेकडो कामगारांच्या चेहऱ्यावर भीतीची छटा आणखी काही दिवस तरी नक्कीच राहणार आहे. 

बस्तवडे दुर्घटनेची आठवण 
आजच्या घोटवडेच्या घटनेने दोन वर्षांपूर्वी बस्तवडे येथे झालेल्या अपघाताची आठवण करून दिली. कागल एमआयडीसीतील कामगारांना घेऊन जाणारी गाडी पाण्यात बुडून सात कामगारांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर काही ठिकाणी एसटीची सुविधा उपलब्ध झाली. मात्र, अजूनही अनेक भागातून कामगारांना असाच जीवघेणा प्रवास करावा लागतो. 

आता तरी लक्ष द्या 
एरवी प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारे लोकप्रतिनिधी रोजगार निर्मिती करण्यात इतके असंवेदनशील का? असा प्रश्न यानिमित्ताने पडत आहे. या भागात एखादा औद्योगिक प्रकल्प किंवा औद्योगिक वसाहत होण्यासाठी प्रयत्न झाले तर अनेक तरुणांच्या हाताला काम मिळेल. शिवाय त्यांचा सुरू असलेला हा धोकादायक प्रवासही थांबणार आहे. मात्र, अशा दुर्घटनांत मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यापलीकडे आजपर्यंत काहीही झालेले नाही. स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रकल्प या भागात आणावेत, अशी मागणी होत आहे.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com