कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना गरजेची

सदानंद पाटील
गुरुवार, 14 मार्च 2019

कोल्हापूर हा औद्योगिक व कृषी क्षेत्रात अग्रेसर जिल्हा आहे; मात्र कृषी व औद्योगिक विकासाची फळे ही ठराविक भागापुरतीच मर्यादित राहिली आहेत. कमी-अधिक प्रमाणात असलेल्या डोंगरी भागातील तालुक्‍यात मात्र विकासाचा चढता आलेख कधी दिसला नाही. त्यामुळेच हे तालुके शैक्षणिक, औद्योगिक व कृषी क्षेत्रात तुलनेने मागे राहिले आहेत. त्यांच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.

कोल्हापूर ही क्रांतिकारी नगरी आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असणारी अनेक मंडळी जिल्ह्यात आहेत. जुन्या, जाणत्या मंडळींनी इथे उद्योगाचा पाया घातला आणि पुढील पिढीने त्याला आधुनिकतेची झालर दिली; मात्र हा औद्योगिक विकास सर्व जिल्ह्यांत न होता त्याची पॉकिटे तयार झाली आहेत.

बाकीच्या तालुक्‍यांत म्हणावी तशी रोजगार निर्मिती न झाल्याने तेथील बहुतांश लोक रोजगारासाठी औद्योगिक क्षेत्राकडे धावत आहेत. फार मोठी मिळकत नसली तरी दैनंदिन चरितार्थ चालतो, एवढ्यासाठीच ही मंडळी शहराकडे धावत आहेत. थोडीबहुत असलेली शेती आधुनिक तंत्रज्ञानाने पिकवली, त्याला कृषिपूरक उद्योगांची जोड दिली तर गावातील तरुण रोजगारासाठी बाहेर जाणार नाहीत. आपल्याच गावात त्यांना रोजगारही मिळेल आणि शेतीही पिकेल.

कोल्हापूर जिल्हा आज पर्यटनाची खाण आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्‍यांत पर्यटनाची ठिकाणे आहेत. धार्मिक, ऐतिहासिक, मेडिकल, पर्यावरण, वन असे सर्व प्रकारचं पर्यटन जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक धरणांची संख्या आहे. या ठिकाणी वॉटर स्पोर्टस्‌ व साहसी खेळ उपलब्ध करून देणे सहज शक्‍य आहे; मात्र त्याकडे म्हणावे तितके लक्ष देण्यात आलेले नाही.

पर्यटन आराखडे हे केवळ मंदिर, सभामंडप बांधण्यापर्यंतच मर्यादित राहिले आहेत. यासाठी व्यापक विचार होण्याची गरज आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी लाईट आणि म्युझिक शोची व्यवस्था करून पर्यटकांना त्याची भुरळ घालणे सहज शक्‍य आहे. जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे.

जिल्ह्यातील कृषीमध्ये बहुविधता आहे. अन्नधान्यापासून नगदी पिकापर्यंत आणि फळांपासून भाजीपाला-दुग्धजन्य पदार्थांपर्यंत मोठे उत्पादन होते; मात्र या सर्व उत्पादनावर दुय्यम प्रक्रिया करून अधिक उत्पादन मिळवणे शक्‍य आहे. यासाठी छोटी छोटी कृषी प्रक्रिया केंद्रे निर्माण करणे शक्‍य आहे.

तालुकानिहाय कृषी उत्पादन व त्यावर होणाऱ्या प्रक्रियेचा अभ्यास करून प्रकल्प उभे केल्यास ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होईल. जर गावातच रोजगार निर्माण झाला तर गावांना शहरावर अवलंबून राहावे लागणार नाही. गावे स्वयंपूर्ण होतील आणि खऱ्या अर्थाने खेड्यांचा विकास घडून येईल.
समाजकारण करत असताना राजकारणाशिवाय पर्याय नाही.

राजकारणाच्या माध्यमातून विकासाचा जागर घालणे सहज शक्‍य आहे. त्यामुळेच ग्रामविकास डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही देसाई परिवार राजकारण करत आहोत. आतापर्यंत आजोबांना, वडिलांना विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी दिली. आपणही ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर निवडून येऊन ग्रामविकासाचा रथ चालवण्याचा प्रयत्न केला आहे. आता विधानसभेला नशीब आजमावणार आहे. ग्रामीण भागातील जनतेने मतदारसंघाच्या विकासासाठी आपणाला एक संधी द्यावी, एवढीच अपेक्षा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Desai interview