राहुरीकरांना भाजीपाला, गॅस टाकी घरीच मिळणार फक्त डायल करा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.  नागरिकांनी घरगुती वापराच्या गॅस टाकीच्या नोंदणी व मागणीसाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊ नये.

राहुरी - भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने उद्या (बुधवार) पासून भाजीपाला विक्रेत्यांना एका जागी बसून भाजीपाला विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. फेरीवाल्यांना घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्यास परवानगी आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राहुरी शहरात काल (मंगळवार) पर्यंत एका जागी बसून भाजीपाला  विक्रीसाठी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत भाजीपाला विक्रेत्यांना वेळ ठरवून दिली होती. परंतु, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करीत होते. त्यामुळे, कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता. भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना एका जागी बसून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. फक्त फेरीवाल्यांना घरोघरी जाऊन, गर्दी टाळून भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

तहसीलदार शेख म्हणाले, "शहरात एकही खासगी वाहन, दुचाकी व चारचाकी वाहनांना फिरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी पायी बाहेर पडावे. विनाकारण कोणीही बाहेर पडू नये. अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागेल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.  नागरिकांनी घरगुती वापराच्या गॅस टाकीच्या नोंदणी व मागणीसाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊ नये.

फोनद्वारे खालील नंबरला बुकिंग करावे. गॅस सिलेंडर घरपोच केले जातील."

गॅस एजन्सीच्या संपर्काचे नंबर असे : १) एचपी गॅस एजन्सी (श्रीरामपूर) - ९२२६९७४६८१, २) हेमराज भारत गॅस एजन्सी (राहुरी) - ७०३८३०००१४, ३) अधोक श्रीगणेश एचपी गॅस एजन्सी (राहुरी) - ०२४२६-२३३३१४, ४) करपे एचपी गॅस एजन्सी (टाकळीमिया) - ९८६०००३०३०, ५) लक्ष्मी भारत गॅस एजन्सी (राहुरी) - ९६०४१११२५३, ६) एचपी गॅस एजन्सी (वांबोरी) - ९९७५३१५८९१. 

राहुरी तहसील कार्यालयात भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून 'एक तालुका उपविभागीय अधिकारी' पदावर नियुक्ती झाली आहे.  मे अखेर त्यांचा नियुक्तीचा कालावधी आहे.  असेही तहसीलदार शेख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahurikar will get gas vegetable at home