
सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह कर्नाटकातील हजारो चाकरमानी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना आवश्यक पॅसेंजर गाड्या सोडण्यास अद्यापही रेल्वे बोर्ड टाळाटाळच करते आहे.
मिरज : सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह कर्नाटकातील हजारो चाकरमानी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना आवश्यक पॅसेंजर गाड्या सोडण्यास अद्यापही रेल्वे बोर्ड टाळाटाळच करते आहे. मार्च महिन्यात या गाड्या सोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची केवळ चर्चाच घडवून आणली जाते आहे. त्यासाठी कोणतीही तयारी बोर्डाने अद्याप केलेली नाही. पॅसेंजर गाड्यांवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांची दिशाभूल करण्याचे रेल्वे बोर्डाचे धोरण असल्याचे आता स्पष्ट होते आहे. नेहमीप्रमाणे याबाबत खासदार, आमदार, रेल्वे प्रवासी संघटना सगळेच गप्प असल्याने हजारो गरजू प्रवाशांना वाली कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लॉकडाऊननंतर रेल्वेने सगळे नियोजनच बदलले आहे. गर्दी खेचणाऱ्या निव्वळ नफा मिळवून देणाऱ्या लांब पल्ल्याच्या किफायतशीर गाड्या सोडून रेल्वेने श्रीमंत प्रवाशांची बऱ्यापैकी सोय केल्याचेही आतापर्यंत सोडलेल्या गाड्यांच्या नियोजनातून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तर रेल्वेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पॅसेंजर गाड्यांमुळे एक्स्प्रेस गाड्यांना विलंब होत असल्याची हूल उठवून या गाड्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
वास्तविक नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आवश्यक असणाऱ्या डेमू आणि मेमू गाड्या सध्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोकळ्या पळवल्या जात आहेत. याच गाड्यांमधून अनेक अनधिकृत प्रवासी प्रवासही करत असल्याचे कळते. मात्र या गाड्या नियमितपणे सोडून प्रवाशांना सेवा देण्याबाबत मात्र रेल्वेचे दक्षिणमुखी अधिकारी काही करायला तयार नाहीत. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने कोल्हापूर, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कऱ्हाड, यांसह पंढरपूर आणि कर्नाटकातील किमान पन्नास ते साठ हजार प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र याबाबत या परिसरातील खासदार, आमदार, रेल्वे प्रवासी संघटनानी मौन धारण केल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पॅसेंजर गाड्या रेल्वेला सुरू कराव्याच लागतील
सामान्य प्रवासी हाच खरा रेल्वेचा आधार आहे. तरीही रेल्वेचे अधिकारी निव्वळ ढोंग करीत आहेत. पॅसेंजर गाड्या रेल्वेला सुरू कराव्याच लागतील. त्यासाठी टाळाटाळ करणे, रेल्वेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना आणि गप्प बसणाऱ्या खासदार, आमदार, रेल्वे प्रवासी संघटनाना परवडणारे नाही.
- प्रकाश साळुंखे, नियमित प्रवासी
रेल्वे बोर्डास निर्णय घेण्यास भाग पाडू
पॅसेंजर गाड्यांचे महत्त्व जाणून घेऊन थेट रेल्वे बोर्डाशी आणि रेल्वेमंत्री पियुश गोयल यांच्याशी आम्ही संपर्क साधला आहे. याबाबत रेल्वे बोर्डास सकारात्मक निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडू.
- मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक, भाजप
संपादन : युवराज यादव