esakal | रेल्वे अर्थ संकल्पात : मिरज-पुणे महामार्गासाठी काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Railway budget : 540 crore for the Mirage-Pune railway road

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मिरज-पुणे रेल्वेमार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी 540 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

रेल्वे अर्थ संकल्पात : मिरज-पुणे महामार्गासाठी काय?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज : यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मिरज-पुणे रेल्वेमार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी 540 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. मात्र, कराड -चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी, हातकलंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी निधीची तरतुद केली नसल्याने नवीन रेल्वेमार्गाचे काम रखडण्याची शक्‍यता आहे.

गतवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-मिरज दुहेरीकरणासाठी 585 कोटी रुपये व पुणे-मिरज-कोल्हापूर विद्युतीकरणासाठी 154 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात पुणे-मिरज-लोंढा या 467 किलोमिटर मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 540 कोटी रूपये तरतुद करण्यात आली आहे. कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत इंजिनाव्दारे प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.

दुहेरीकरणाच्या कामासोबत नवीन प्रस्तावित लोणंद-बारामती, कराड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी गतवर्षी प्रत्येकी दहा लाखांची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी अर्थसंकल्पात आवश्‍यक निधीची तरतूद करून कोल्हापूर-वैभववाडीसह प्रस्तावित नवीन रेल्वे मागार्चे काम सुरु करण्याची मागणी होती. मात्र बारामती-लोणंद मार्गासाठी 3 कोटी व कराड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी या सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वेमार्गासाठी कोणतीही आर्थिक तरतुद करण्यात आलेली नाही. 

सर्व पॅसेंजर व डेमु रेल्वेगाड्यात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. मिरज व कोल्हापूर मॉडेल रेल्वेस्थानके निर्मितीसाठीही अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. मिरज-पंढरपूर मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय कमी आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या वाढवण्याकडे दुर्लक्ष आहे. पुणे-मिरज दुहेरीकरणासोबत या मार्गावर भिलवडी, नांद्रेसह पुण्यापर्यंत सात ठिकाणी उड्डाणपुल व आठ ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.

मिरज-बेळगाव व मिरज कोल्हापूर मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे. क-हाड ते मिरज दरम्यान ताकारी-शेणोली दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून सांगली ते ताकारी या मार्गावरील रेल्वे रूळ बदलण्यात येणार आहेत. मिरज स्थानकात पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युतपुरवठा व्यवस्थेसाठी निधी देण्यात आला आहे. मिरज-पुणे, मिरज-कुर्डुवाडी मार्गावर रेलपथ नुतनीकरण, उड्डाणपुल व भुयारी मार्गासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. 

गरिब रथ, तेजस एक्‍सप्रेस सुरू कराव्यात

550 स्टेशनला वाय-फाय सुविधा देण्यात आली यापासून 27000 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणे याच बरोबर रेल्वेमार्ग लगतच सोलर पावर ग्रीड बनवणे यासह 150 तेजस एक्‍सप्रेस नवीन गाड्या प्रसिद्ध स्थळापर्यंत सुरू करणार असे सांगण्यात आले मात्र रेल्वे प्रशासन तेजस एक्‍सप्रेस सारख्या गाड्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP सोबत सुरू करत असून आतापर्यंत दिल्ली - लखनऊ व मुंबई-अहमदाबाद या मार्गावर तेजस एक्‍सप्रेस सुरू करण्यात आलेल्या आहेत.रेल्वे प्रशासनाने तेजस एक्‍सप्रेस हमसफर एक्‍सप्रेस बरोबर गोरगरिबांना व मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी गरिब रथ सारख्या तेजस एक्‍सप्रेस सुरू कराव्यात. 
- किशोर भोरावत, रेल्वे सल्लागार समिती सदस्य 

नवीन रेल्वेमागार्साठी निधी नाही

यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन रेल्वेमागार्साठी निधी मिळाला नसल्याने नवीन रेल्वेमार्गाचे काम रखडणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी, कजहाड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून हे काम सुरू झाले नाही तर अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे. 
- सुकुमार पाटील, सचिव रेल्वे कृती समिती.