सांगलीत परतीचा फटकारा सुरूच; येरळा, नांदणील पूर; आटपाडीत वाहतूक ठप्प

बलराज पवार
Monday, 12 October 2020

आज सलग दुसऱ्या दिवशी सांगली शहरासह जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा बसला. आजही दुपारनंतर पावसाने संततधार रिपरिप सुरूच ठेवली. कडेगाव तालुक्‍यात येरळा, नांदणी नद्यांना पूर आला.

सांगली : आज सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा बसला. आजही दुपारनंतर पावसाने संततधार रिपरिप सुरूच ठेवली. कडेगाव तालुक्‍यात येरळा, नांदणी नद्यांना पूर आला. पलूस, आटपाडी तालुक्‍यालाही पावसाने दणका दिला. आटपाडी तालुक्‍यात वाहतूक ठप्प झाली. सोयाबीन, भात आणि उसाचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष छाटणीही शेतकऱ्यांना थांबवावी लागली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे. 

सांगली शहरासह परिसरात दुपारपासून आभाळ भरून आले आणि संततधार सुरू झाली. सुटीचा दिवस असल्याने बाजारात नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे नागरिकांना छत्र्या, रेनकोट बाहेर काढावे लागले. रस्ते खराब असल्याने त्यात पाणी साचून डबकी तयार होउन वाहनधारकांची पंचाईत झाली, तर उपनगरासह गुंठेवारीत या सततच्या रिपरिपीमुळे जनजीवन विस्कळित झाले. कडेगाव, पलूस, आटपाडी तालुक्‍यातही पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. 

अमरापूर पुलावर पाणी 
कडेगाव : तालुक्‍याला आज सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने येरळा, नांदणीसह नदी-ओढ्या नाल्यांना पूर आला. नांदणीला पूर आल्याने गुहागर-विजापूर महामार्गावरील अमरापूर (ता. कडेगाव) येथील हंगामी पुलावर पाणी आले. वाहतूक बंद झाली आहे. अनेक ठिकाणी उशिरापर्यंत वीज खंडित झाली होती. 

आज दुपारपासून चार तास जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले. उसाचे पीक भुईसपाट झाले. आल्यासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. काढलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

पलूसला ऊस, भात, सोयाबीनचे नुकसान 
पलूस : तालुक्‍यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस सुरू आहे. भात, सोयाबीन, ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले. पावसाने द्राक्ष छाटणीची कामे थांबली. ओढे, नाल्यांना पाणी आले. शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान झाले. सोयाबीन काढणी सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्याने नुकसान होत आहे. भातशेती पाण्याखाली गेली आहे. द्राक्ष छाटणीत अडथळा निर्माण झाला. पिकाला लावलेले केमिकल व औषध पावसाने धुवून जात आहे. 

नेलकरंजीजवळ पूल वाहून गेला 
खरसुंडी ः आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आटपाडी-खरसुंडी रस्त्याची वाहतूक पूर्ण खंडित झाली. नेलकरंजीजवळील पूल वाहून गेला. चार मार्गांवरील पुलावर पाच फूट पाणी वाहत आहे. 

आज दुपारी तीननंतर मुसळधार पावसामुळे आटपाडी व खरसुंडी मार्गावरील भिवघाट मासाळ वस्ती पूल पाण्याखाली गेला. नेलकरंजी खरसुंडीकडे जाणारा नेलकरंजीजवळील पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली. अर्जुनवाडीकडे जाणारा नेलकरंजीशेजारील पूलही पाण्याखाली गेला. भोसले वस्ती येथील पूल पाण्याखाली गेला आहे. प्रत्येक पुलावर पाच फूट उंचीचे पाणी वाहत आहे. सायंकाळी चार वाजल्यापासून ही स्थिती निर्माण झाल्याने आटपाडी व खरसुंडीकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. आवटेवाडीशेजारील करंजवडा येथेही पुलावर जास्त पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पाईप वाहून गेल्याने पुलच वाहून गेला हे कळू शकले नाही. चार मार्गावरील पूल पाण्याखाली आहेत. खरसुंडीशेजारील ओढ्यावरही काही काळ वाहतूक बंद होती. 

झरे परिसरात रिपरिप 
झरे : आटपाडी परिसरात आजही दुपारपासून पाऊस सुरू झाला. जनजीवन विस्कळित झाले. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. खरीप पिके पडून आहेत. रब्बीसाठी मशागत कशी करायची हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. ते करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain hots Sangli district; floods to Yerla, Nandini ; traffic jam at Atpadi